वाहन पसंतीक्रमांकांचा नादच खुळा!

पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना या वाहनांना आपल्या पसंतीचा आकर्षक क्रमांक मिळविण्याची क्रेझही चांगलीच वाढली आहे. मागील वर्षभरात पुणेकरांनी त्यासाठी तब्बल ३६ कोटी रुपये उधळले आहेत. आरटीओला केवळ पसंती क्रमांकातून पहिल्यांदाच इतका मोठा महसूल मिळाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 12:51 am
वाहन पसंतीक्रमांकांचा नादच खुळा!

वाहन पसंतीक्रमांकांचा नादच खुळा!

आकर्षक क्रमांकांसाठी पुणेकरांनी वर्षभरात उधळले ३६ कोटी रुपये, परिवहन विभाग मालामाल

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना या वाहनांना आपल्या पसंतीचा आकर्षक क्रमांक मिळविण्याची क्रेझही चांगलीच वाढली आहे. मागील वर्षभरात पुणेकरांनी त्यासाठी तब्बल ३६ कोटी रुपये उधळले आहेत. आरटीओला केवळ पसंती क्रमांकातून पहिल्यांदाच इतका मोठा महसूल मिळाला आहे.

विशेष म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये सुमारे १४ कोटींची वाढ झाली आहे. यामुळे परिवहन विभाग मालामाल झाला आहे. या दोन वर्षांच्या तुलनेत वाहनसंख्याही तब्बल सव्वा लाखाने अधिक वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

वाहन खरेदी करताना मालकांकडून वाहनाला विशिष्ट क्रमांक मिळावा यासाठी आग्रह केला जातो. अनेकजण एकाच क्रमांकासाठी इच्छुक असल्याने शासनाकडून या क्रमांकासाठी वाढीव शुल्क आकारले जाते. आरटीओकडून त्यासाठी अर्ज मागवून लिलाव पद्धतीने या क्रमांकाचे वाटप केले जाते. शासनाने सप्टेंबर २०२२ मध्ये निश्चित केलेल्या शुल्कानुसार ०००१ या क्रमांकासाठी दुचाकी, तीनचाकी आणि परिवहन वाहनांना एक लाख रुपये तर वाहनांना सहा लाख रुपये मोजावे लागतात.

अनेक जण नोंदणी शुल्काव्यतिरिक्त एवढे पैसे भरून हा वाहन क्रमांक राखून ठेवतात. त्या खालोखाल ०००९, ००९९, ०७८६, ०९९९ व ९९९९ या क्रमांकासाठी अनुक्रमे ५० हजार आणि अडीच लाख रुपये वाढीव शुल्क आहे. मालिकेच्या शेवटच्या क्रमांकापासून एक हजारापेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही क्रमांकासाठी असलेले शुल्क दुचाकीसाठी ६ हजार आणि कारसाठी १५ हजार रुपये एवढे आहे, तर एक हजार क्रमांकापर्यंतच्या क्रमांकासाठी अनुक्रमे पाच हजार आणि १० हजार रुपये शुक्ल भरावे लागते.

पुण्यातील आरटीओ कार्यालयामध्ये आकर्षक क्रमांसाठी सातत्याने मोठी मागणी असते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २२ कोटी २१ लाख रुपये भरून वाहन मालकांनी विविध आकर्षक क्रमांक घेतले. मागील वर्षी मात्र त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी पसंती क्रमांकातून १४ कोटी रुपयांचा अधिक महसूल मिळाला आहे. यावेळी ३६ कोटीहून अधिक महसूल प्राप्त झाला असल्याचे भोर यांनी स्पष्ट केले. यंदा पहिल्यांदाच आरटीओला केवळ पसंती क्रमांकातून एवढा महसूल मिळाला आहे. त्यामुळे पुणे आरटीओ मालामाल झाले आहे.

पुण्यामध्ये वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रामुख्याने दोन वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी दुचाकींची संख्येत ८५ हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षी एकूण वाहन विक्री २ लाख ९२ हजारांवर गेली. त्यामध्ये सुमारे ३० हजार इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश आहे. पुणेकरांचा इलेक्ट्रिक वाहनांकडील कलही वाढत चालल्याचे चित्र आहे. दोन वर्षांच्या तुलनेत ही वाढ तब्बल २० हजारांनी अधिक आहे. वाहन संख्या वाढल्याने पसंती क्रमांकासाठी अर्ज वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हाय सेक्युरिटीला फाटा

मागील चार वर्षांपासून नवीन वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बंधनकारक केली आहे. वाहन विक्रेत्यांकडूनच ही नंबर प्लेट बसवून मालकाच्या ताब्यात वाहन दिले जाते. त्यावर विशिष्ट रचनेत क्रमांक असतो. पण अनेकांकडून ही प्लेट काढून त्याजागी दुसरी प्लेट लावून नोंदणी क्रमांक आकर्षक पद्धतीने लिहिला जातो. अनेकजण तर त्यासाठी आकर्षक क्रमांक घेतात. अशा वाहनांवर आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असली तरी हे प्रमाण कमी असल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांनी मान्य केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story