ढोलताशांच्या दणदणाटामुळे वनजीवांचे मूक आक्रंदन
गौरव कदम
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळ सुरू झालेल्या ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे प्राणी संग्रहालयातील प्राणी प्रचंड बिथरू लागले आहेत.
अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे प्राणी असामान्य वर्तन करीत आहेत. यामुळे संग्रहालयातील प्राण्यांना होणारा त्रास प्रत्यक्ष दिसत असला तरी सर्वच प्राणी आणि पक्षी यांच्या वर्तणुकीत बदल झाला असल्याचे निरीक्षण येथील कर्मचाऱ्यांनी नोंदवले आहे.
गणेशोत्वासच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी ढोलताशा पथकांचा सराव जोरात सुरू झाला आहे. आतापर्यंत शहराच्या मध्यभागात या सरावाची केंद्रे होती. यंदा कात्रज प्राणी संग्रहालयातील पीएमपीएमएलच्या जागेवरही एका पथकाने सराव सुरू केला आहे. त्यामुळे एरवी शांत असलेल्या या परिसरात अचानक दणदणाट सुरू असल्याने प्राण्यांना त्याचा त्रास होऊ लागला आहे.
प्राणीसंग्रहालयातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘‘ढोलताशांच्या दणदणाटाचे प्रतिध्वनी दूरपर्यंत ऐकू येतात. त्याचा त्रास प्राण्यांना होत आहे. या ढोलताशा पथकांनी सरावासाठी पर्यायी जागा शोधल्यास त्यांना प्राण्यांचे आशीर्वाद मिळतील.’’
‘‘प्राणीसंग्रहालयाजवळ ढोल- ताशाच्या सरावाचा व्हीडीओ मी पाहिला आहे. प्राण्यांसाठी हा आवाज चिंताजनक आहे,’’ अशी प्रतिक्रिया पुणे जिल्ह्याचे वनरक्षक आदित्य परांजपे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली. कात्रज येथील रहिवासी शितल मोरे यांनी सांगितले की, ‘‘रात्री १० वाजेपर्यंत सुरू असलेल्या ढोल-ताशांमुळे केवळ प्राणिसंग्रहालयच नाही तर आजूबाजूला राहणारे रहिवासीही त्रस्त झाले आहेत. माझ्या घरात पाळीव प्राणी आहेत. ते कसे घाबरतात, हे आम्हाला दिसत आहे. ते पाहून प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच केलेली बरी. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करायला हवी.’’
‘‘दरवर्षी महिनाभर पथकांचा सराव चालतो. आवाजामुळे प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांनाही उपद्रव होतो, याची आम्हाला कल्पना नव्हती. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यास, आम्ही एक संयुक्त बैठक आयोजित करू. या ढोलताशा पथकाला सरावासाठी पर्यायी जागा शोधण्यास सांगू,’’ असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय पुराणिक यांनी सांगितले. एका ढोलताशा पथकाच्या प्रमुखाने सांगितले की, ‘‘पीएमपीएमएल पार्किंगच्या जागेत पाच पथके त्यांच्या वेळेनुसार सराव करतात. सुमारे साडेचारशे वादक असून त्यांच्या वेगवेगळ्या बॅच आहेत. सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच आम्ही सराव करत आहोत. त्यामुळे कोणाला त्रास होत असेल, असे वाटत नाही.’’