७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार
सोसायटीमध्ये रक्षणासाठी सुरक्षा रक्षक ठेवावा की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, रक्षणासाठी ठेवलेला सुरक्षा रक्षकच एका चिमुकलीच्या मुळावर उठल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पुनावळेमधील एका सोसायटीत सुरक्षा रक्षकाने ७ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
या प्रकरणी सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. मन्टुकुमार श्रीशिवकुमार गौंड (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी ७ वर्षीय चिमुकलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे परिसरातील ध्रुव नावाच्या सोसायटीमध्ये मन्टुकुमार हा सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. बुधवारी (दि. २६) सायंकाळी ६ च्या सुमारास याच सोसायटीमधील ७ वर्षाची चिमुकली इतर मुलींसोबत सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळत होती.
यावेळी नराधम सुरक्षा रक्षकाने चिमुकलीला सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या पुरूष टॉयलेटमध्ये नेले. त्यानंतर नराधमाने चिमुकलीवर जबरस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब चिमुकलीच्या आईल समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.