कृत्रिम बेटाची घाई, लोकांच्या डोक्यात जाई

पुण्यात झालेल्या जी-२० परिषदेसाठी संपूर्ण पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याचा घाट घालण्यात आला. काही देखावे उभारण्यात आले. भिंती रंगवल्या, पथदिवे, एलईडी, लाइटिंग लावून रस्ते, पदपथ चकाचक करण्यात आले. पुणे स्वच्छ शहर असल्याचे दाखवण्याचा मनपाने प्रयत्न केला. घाईत केलेले कृत्रिम देखावे आता मात्र सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 07:56 am
कृत्रिम बेटाची घाई, लोकांच्या डोक्यात जाई

कृत्रिम बेटाची घाई, लोकांच्या डोक्यात जाई

जी-२० साठी विमानतळासमोर उभारलेला अरुंद रस्त्यावरील देखावा ठरतोय वाहतुकीला मोठा अडथळा

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

पुण्यात झालेल्या जी-२० परिषदेसाठी संपूर्ण पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याचा घाट घालण्यात आला. काही देखावे उभारण्यात आले. भिंती रंगवल्या, पथदिवे, एलईडी, लाइटिंग लावून  रस्ते, पदपथ चकाचक  करण्यात आले. पुणे स्वच्छ शहर असल्याचे दाखवण्याचा मनपाने प्रयत्न केला. घाईत केलेले कृत्रिम देखावे आता मात्र सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत.

जी-२० साठी विमानतळ रस्त्यावर सिम्बायोसिसशेजारी अशास्त्रीय पद्धतीने कृत्रिम बेट आणि कारंजे उभारण्यात आले.  रस्त्याच्या मधोमध हे  बेट बांधण्यात आलेले असून त्याचा व्यास १० ते १२ फूट आहे. आधीच  रस्ता अपुरा असताना त्यात हा उपद्व्याप केल्याने दररोजच्या वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. अरुंद रस्ता अपघातालाही निमंत्रण देणारा ठरत आहे. कृत्रिम  बेटावरून वाहने वळताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.  सरळ जाणारी वाहनेही धडकत आहेत. मनपाकडून कोंडी फोडण्यासाठी काही उपाययोजना होत नसताना अडचणी वाढवण्याचे काम मनपाचे अधिकारी मात्र चोखपणे पार पाडत आहेत.

हे वाहतुकीचे बेट उभारताना निदान वाहतूक पोलिसांचे तरी मत घेणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकला तसे करण्याची आवश्यकता भासली नव्हती. आता मात्र या चौकात कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस ठेवावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते,  ‘‘मनपाच्या काही  अधिकाऱ्यांनी गरज नसताना एका विकसकाकडून हे  कृत्रिम बेट बांधून घेतले आहे.  विमानतळ रस्त्यावर विकसकाच्या व्यवसायाच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्कल शोभा वाढविण्यासाठी की जाहिरासाठी हा प्रश्न पडला आहे.’’

स्थानिक राहिवासी असलेले महेश मांजरे म्हणाले, ‘‘सिम्बायोसिस चौकात नेहमी वर्दळ असते. शक्यतो सकाळी ११ आणि संध्याकाळी ५च्या सुमारास येथे वाहतूक कोंडी होते. रस्ता रुंद असणे आवश्यक असताना या बेटामुळे मात्र रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे वाहने वळवणे एक मोठे दिव्यच ठरत आहे. यावर तातडीने उपाय योजने अपेक्षित आहे. पालिकेचे उच्चशिक्षित अभियंते नेमके काय करतात, हाही मोठा प्रश्न आहे. अशा निरुपयोगी कामासाठी खरे तर त्यांना पुरस्कार द्यायला हवा.’’

नाव न सांगण्याच्या अटीवर पालिकेच्या रस्ता विभागाचे अधिकारी म्हणाले, ‘‘जी-२० साठी रस्ते सुंदर दिसावे,  या हेतूने आम्ही अनेक खासगी विकसकांना आवाहन केले होते. त्याचाच भाग म्हणून अशी बेटे आणि रंगरंगोटी करण्यात आली. पालिकेकडे पुरेसा वेळ नसल्याने हीमदत घेण्यात आली होती. पण त्यात चुका झाल्या असल्यास दुरुस्त करण्यात येतील.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story