पोलिसांची 'रिहर्सल' की, कोंडीचा 'रिॲलिटी शो'?
विजय चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांनी सोमवारी सकाळी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. मात्र, स्थानिक प्रशासनाने पुरेशी खबरदारी न घेता अचानक मध्य भागातील रस्ते बंद केले. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार, शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने, मालवाहतूक करणारे टेम्पो रस्त्यातच अडकले आणि वाहतुकीचा बोजवारा उडाला. नागरिकांना याचा नाहक मनस्ताप सोसावा लागला आहे.
पुणेकरांनी याबाबत संताप व्यक्त करून मोदींच्या कार्यक्रमासाठी मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याची काय गरज होती, असा सवाल केला आहे. पुण्यातील अनेक मार्ग सोमवारी रात्रीपासूनच बंद करण्यात आले असून, शहराच्या मध्यवर्ती भागांत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी महापालिका आणि प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्यात रस्त्यांच्या डागडुजीपासून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचाही समावेश आहे.
मोदी यांच्या वाहनांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर बंदोबस्ताची सोमवारी सकाळी अकरानंतर रंगीत तालीम घेण्यात आली. टप्याटप्याने शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. प्रमुख रस्ते, लेन, चौकात सरकते लोखंडी कठडे (बॅरिकेडिंग) उभे करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अचानक वाहतूक बंद केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय झाली.
मेट्रो प्रकल्पातील वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावरील मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान मार्च २०२२ मध्ये पुण्यात आले होते. त्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ते आता पुन्हा पुण्यात येत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती करून पंतप्रधानांचा पुणे दौरा सुरू होणार आहे. त्यानंतर ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत. पुणे मेट्रो टप्पा १ चे काम पूर्ण झालेले फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक, तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेली १२८० हून अधिक घरे, तर पुणे महापालिकेने बांधलेल्या २६५० हून अधिक घरांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागात दौरा असल्यामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तसेच, काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल केला आहे. रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्तही असेल. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकायचे नसेल, तर नागरिकांनी शहराच्या मध्य भागात येण्याचे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.