‘स्पा’चा मंद प्रकाश पोलिसांना दिसेना!
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
‘स्पा’च्या नावाखाली चालणाऱ्या बंद खोलीतील कारभारावर पोलिसांचा कानाडोळा होत असून, वाकड परिसरात सध्या स्पा सेंटरचे बोर्ड ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. मंद प्रकाशात नेमके काय चालते याच्या तपासणीत पिंपरी-चिंचवड पोलिसांचे सातत्य नसल्याने स्पाच्या नावाखाली अनेक अवैध उद्योग वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी भागात राजरोसपणे सुरू आहेत.
या भागातील स्पा सेंटरमध्ये दररोज किमान १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल होत असून, एका स्पामध्ये किमान ३ ते कमाल ८ ते १० मुलींना मसाज करण्यासाठी कामाला ठेवण्यात आले आहे. मात्र, केवळ मसाज न होता येथे बंद दाराआड चालणाऱ्या अवैध उद्योगांना स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अभय असल्याचे ‘सीविक मिरर’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून उघड झाले आहे.
गुन्हे शाखा आणि थेट अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालणाऱ्या सामाजिक सुरक्षा पथकाकडून यापूर्वी स्पा अथवा वेश्या व्यवसायावर कारवाई केली जात होती. मात्र, या पथकाच्या तसेच स्थानिक पोलिसांच्या कारवाईत सातत्य राहिलेले नाही. त्याचबरोबर काही ठराविक ठिकाणी कारवाई होते. मात्र या कारवाईच्या देखाव्याखाली सर्वांना अभय दिले जात असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या साई चौकातील (जगताप डेअरी चौकाजवळ) कॅसल स्पा अॅंड वेलनेस सेंटरवर चार महिन्यांच्या फरकाने दोन वेळा सामाजिक सुरक्षा पथकाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, वाकड पोलिसांना दोन्ही वेळा कारवाई झाल्यानंतरच असे काही आपल्या भागात सुरू असल्याचे समजले होते. आताही वाकड परिसरातील जगताप डेअरी चौक ते कोकणे चौक या पट्ट्यातील अनेक इमारतींमध्ये स्पा सेंटर सुरू आहेत. एकेका इमारतीत चार-पाच स्पा सेंटर असून, वाकडमधील एकट्या दत्तमंदिर रस्त्यावर दुतर्फा ठिकठिकाणी स्पा सेंटरचे बोर्ड पाहायला मिळतात.
वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षक दिवसातून किमान एक वेळा तरी याच रस्त्यावरून सरकारी वाहनातून प्रवास करीत असतात. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांना एकदाही स्पा सेंटरचे झळकणारे बोर्ड दिसले कसे नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे.
वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर या परिसरात राहणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षितांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अनेक इमारतींमध्ये पहिले दोन मजले हे व्यावसायिक तर त्यावरील इमारत रहिवासी आहे; या प्रकारच्या इमारतींमध्येदेखील स्पा सेंटर थाटण्यात आले असून, वाकड पोलिसांकडून मात्र स्पा सेंटरमध्ये काही अवैध उद्योग चालतात का, याची तपासणी होताना दिसत नाही.
दीड वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रासाठी सामाजिक सुरक्षा पथक सुरू करण्यात आले होते. या पथकाला तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचे अधिकार दिले होते. परंतु, प्रार्थनास्थळे, हॉस्पिटल आणि शाळांसह सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे कारवाईत उघड झाल्यानंतर ते दुकान अथवा घर सील करण्याचे अधिकार आतापर्यंत पुणे पोलीस आयुक्तांना होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा विभाग सुरू करण्यास शासनाकडून परवानगी मिळाली असल्याने पथकाचे नामकरण सामाजिक सुरक्षा विभाग असे करण्यात आले. सातत्याने अशा प्रकारचे अवैध उद्योग सुरू असल्याचे आढळून आल्यास ते दुकान अथवा फ्लॅट सील करण्याचे अधिकार शासनाकडून पिंपरी-चिंचवड आयुक्तांना देण्यात आले आहेत. मात्र, शहरातील एकही दुकान अथवा फ्लॅट, घर आतापर्यंत सील करण्याची कारवाई पिंपरी-चिंचवडमध्ये झालेली नाही.