दुभाजकातल्या झाडांची जागा डांबराने भरली

आधीच पुणे शहरातील वृक्षवल्लीचे प्रमाण घटत चालले आहे. त्यात जिथे झाडे लावणे शक्य आहे अशा जागांवरती झाडे उगवू शकणार नाहीत, याची काळजी घेतली जात असल्याचे समोर आले आहे. कात्रज डेअरीच्या समोर पादचारी मार्गाच्या कडेने दुभाजकामधे झाडे लावण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. डेअरीसमोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 24 Mar 2023
  • 08:07 am
दुभाजकातल्या झाडांची जागा डांबराने भरली

दुभाजकातल्या झाडांची जागा डांबराने भरली

कात्रज येथील रस्ता सुशोभीकरणाचा पालिकेला विसर; झाडे उगवू नयेत, याची घेतली जातेय काळजी

राहुल देशमुख / नितीन गांगर्डे

rahul@punemirror.com/

nitin.gangarde@civicmirror.in

आधीच पुणे शहरातील वृक्षवल्लीचे प्रमाण घटत चालले आहे. त्यात जिथे झाडे लावणे शक्य आहे अशा जागांवरती झाडे उगवू शकणार नाहीत, याची काळजी घेतली जात असल्याचे समोर आले आहे. कात्रज डेअरीच्या समोर पादचारी मार्गाच्या कडेने दुभाजकामधे झाडे लावण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. डेअरीसमोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. शिल्लक राहिलेले डांबर दुभाजकामध्ये झाडे लावण्यासाठी ठेवलेल्या जागेत टाकण्यात आले आहे. ही जागा डांबराने बुजवल्यानंतर तिथे पुन्हा झाडे लावली तरीही ती वाढण्याची शक्यता राहणार नाही.  

कात्रज डेअरीसमोरील झाडे लावण्यासाठी ठेवलेली जागा अनेक वर्षांपासून तशीच पडीक आहे. त्यावर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले पाहावयास मिळत आहेत, तर काही ठिकाणी पथविक्रेते विक्रीसाठी बसत आहेत. येथील रस्त्याचे बांधकाम होऊन अनेक दिवस लोटले आहेत. मात्र महानगरपालिकेने याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सातारा रस्त्यावरील राजीव गांधी उद्यानाजवळ दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दुभाजक हे कमी उंचीचे आहेत. त्यामुळे त्यावर दुचाकी चालक आपल्या दुचाकी घालत आहेत. रिक्षाचालकही यावरून गाड्या घालत आहेत. या दुभाजकामध्ये झाडे लावण्यासाठी माती टाकण्यात आली आहे, मात्र झाडे लावण्यासाठीचा मुहूर्त अजून सापडलेला नाही. त्यामुळे माती रस्त्यांवर पसरली आहे. त्यात झाडे लावायचे महानगरपालिका विसरून गेल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. ज्या उद्देशासाठी दुभाजकात माती टाकली आहे त्याचाच विसर पडल्यामुळे त्यामध्ये आता शिल्लक राहिलेल्या डांबराची भर घालून कूशोभीकरण करण्यात आले आहे.

डांबरीकरणाचे काम करताना काही ठिकाणी येथील दुभाजक तुटलेले आहेत. त्याचे सिमेंटचे तुकडे येथे पडलेले आहेत. त्याचीही दुरुस्ती करण्यात आली नाही. दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी ठेवलेल्या जागेत डांबर टाकण्यात आल्याबद्दल विचारणा केली असता महानगरपालिकेतील पथविभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांनी, असे काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे. महानगरपालिकेकडून असे होऊच शकत नाही. मी उद्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन याची पाहणी करणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले आहेत.

दुभाजक हे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बांधले जातात. त्यातच डांबर टाकून बुजवायचे असतील तर खर्च करून बांधलेच कशाला, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. येथील नगरसेवक युवराज बेलदरे यांनी सांगितले की, या ठिकाणी असलेल्या दुभाजकामध्ये झाडे लावण्यासाठी मी अनेकदा महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या ठिकाणी दुभाजकावर डांबर टाकण्यात आले आहे. त्याला जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि येथे टाकलेले डांबर लवकरात लवकर काढून त्या ठिकाणी झाडे लावण्यात यावीत.

महानगरपालिकेने जबाबदारी घेत काळजीपूर्वक कामे केल्यास नवीन बांधलेले रस्ते भकास वाटणार नाहीत. प्रत्यक्षात महानगरपालिकेला मात्र याचा  विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. रस्ता बांधकाम, रुंदीकरण, सुधारणा यासाठी पहिला बळी झाडांचा जातो. मात्र त्या लावण्यासाठी जागा ठेवलेली असताना कोणताही मुलाहिजा न बाळगता याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नवीन रस्त्याच्या कडेने आणि दुभाजकामध्ये झाडे लावली जातात. समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटचा डोळ्यावर पडणारा प्रखरझोत झाडांमुळे कमी होतो. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमधून बाहेर पडणारा धूर व उडणारी धूळ शोषून घेण्यासाठी रस्त्याकडेच्या झाडांची योजना असते. हे माहीत असूनही संबंधित यंत्रणा झाडे लावणे आणि व लावली तर जोपासणे याकडे दुर्लक्ष करत आहेत.

येथील दुभाजकांच्या कचराकुंड्या झाल्या असून, महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. येथे रस्त्यावरील दुभाजक फोडले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे मोठे तुकडे ठेवण्यात आले आहेत. महापालिकेने अनेक ठिकाणी  स्वच्छ शहर, सुंदर शहर अशा पाट्या लावल्या आहेत. शहरातील अनेक ठिकाणी असलेली  ही अक्षरे आपले लक्ष वेधून घेतात. मात्र, या अक्षरांवरून नजर हटली अन् दुभाजकात लक्ष गेले की घोर निराशा होते. दुभाजक कचऱ्याने भरलेले असते. शहराची अवकळा या सुंदर स्लोगनमधून उठून दिसते. येथील दुभाजकामध्ये डांबर टाकल्याने ते रस्त्यामध्ये दबून गेले आहे. त्यावरून आता सर्रासपणे वाहने चालवली जात आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story