प्रवाशाला आधी मारहाण, नंतर लूटमार
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
भाड्याच्या पैशांवरून झालेल्या वादातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नाशिक फाटा येथे रविवारी (९ जुलै) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशाला मारहाण करण्याबरोबरच खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले आहेत. अनिल (वय अंदाजे ३०), सचिन (वय ३० ते ३५), गणेश (वय अंदाजे ३० ते ३५) आणि अन्य एक व्यक्ती अशांवर मारहाण करून लूटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील भगवान शेळके (वय ४२, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सुनील हे त्यांचा चुलत भाऊ राकेश यांना नाशिक फाटा येथील एसटी बसस्टॉपवर सोडण्यासाठी गेले होते. या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची गर्दी असते. या लोकांकडून एसटी बसने जाण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना खासगी बस आणि अन्य खासगी वाहनांमधून जाण्यासाठी विचारणा केली जाते. त्याचबरोबर अनेकदा किती भाडे घेणार यावरून वाद होत असतात.
शहरातील नाशिक फाटा (पुणे-नाशिक), चिंचवड रेल्वेस्टेशन (पुणे-मुंबई), हिंजवडी चौक (पुणे-मुंबई), चाकण (नाशिक, औरंगाबाद) आदी भागांतून अवैध प्रवासी वाहतूक चालते. पोलिसांकडून या लोकांवर किरकोळ स्वरूपाची कारवाई केली जाते. त्याचबरोबर पोलिसांना याबाबत विचारणा केली असता, या वाहन चालकांवर कारवाईचे अधिकार प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) असल्याचे सांगून हात वर केले जातात.
चिंचवड रेल्वे स्थानक परिसरात अनेकदा अशाच प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक (पुणे-मुंबई) करणाऱ्यांनी प्रवाशांना मारहाण करणे, त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे वसूल करणे असे प्रकार घडले आहेत.नाशिक फाटा येथे घडलेल्या घटनेत आरोपींनी सुनील शेळके आणि त्यांचा चुलत भाऊ राकेश यांना बेदम मारहाण केली आहे. सुरुवातीला वाद झाल्यावर अनिल नामक अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याने सुनील यांची गचांडी पकडली. त्यानंतर अन्य साथीदारांना बोलावून घेत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये सुनील आणि त्यांच्या भावाला पोटात, छातीवर, पाठीवर, कमरेवर, पायावर गंभीर दुखापत झाली आहे.आरोपींनी सुनील यांच्या खिशातून १३०० रुपये काढून घेतले असून, अन्य प्रवाशांनी मारहाण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर ते सर्वजण पळून गेले.
मी देखील वाहन चालक आहे. किती पैसे लागतात याची आम्हाला माहिती आहे. आम्हाला एसटी बसनेच जायचे आहे, असे सांगत अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. आम्हाला मारहाण करणाऱ्यांची पूर्ण नावे आणि पत्ता माहीत नाही, पण तेथे असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्हीत हा प्रकार निश्चित कैद झाला असेल असे आम्हाला पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या आरोपींना पकडून आम्हाला न्याय मिळेल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे, अशी माहिती सुनील भगवान शेळके यांनी ‘मिरर’शी बोलताना दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.