‘नाटू नाटू’ची ऑस्करगाथा

ऑस्कर विजेत्यांच्या मांदियाळीत भारताने मानाचे स्थान पटकावणे ही देशवासीयांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या ९५ वर्षांच्या इतिहासात 'बेस्ट ओरिजनल साँग' या विभागासाठी दिला जाणारा पुरस्कार पहिल्यांदाच 'आरआरआर' या भारतीय चित्रपटातील 'नाटू नाटू' गीताला मिळाला आहे. यासाठी मी संपूर्ण 'आरआरआर' टीमचे मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांच्या मेहनतीला सलाम करतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 14 Mar 2023
  • 10:47 am
‘नाटू नाटू’ची ऑस्करगाथा

‘नाटू नाटू’ची ऑस्करगाथा

ऑस्कर विजेत्यांच्या मांदियाळीत भारताने मानाचे स्थान पटकावणे ही देशवासीयांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या ९५ वर्षांच्या इतिहासात 'बेस्ट ओरिजनल साँग' या विभागासाठी दिला जाणारा पुरस्कार पहिल्यांदाच  'आरआरआर' या भारतीय चित्रपटातील 'नाटू नाटू' गीताला मिळाला आहे. यासाठी मी संपूर्ण  'आरआरआर' टीमचे मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांच्या मेहनतीला सलाम करतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रासाठी दिले जाणारे अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे अकादमी पुरस्कार 'ऑस्कर' म्हणून ओळखले जातात. १९२९ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेला 'ऑस्कर' हा त्यानंतर अमेरिकेसह संपूर्ण जगातील प्रतिष्ठेचा पुरस्कार ठरला. अमेरिकेत या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण १९५३ मध्ये पहिल्यांदा दूरचित्रवाणीवर दिसले आणि १९६९ मध्ये ते पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित झाले. या सोहळ्याला जगभरातील लाखो प्रेक्षक दरवर्षी उपस्थित राहतात. 

पुरस्काराच्या २४ विभागातील सर्व विजेत्यांना ऑस्करचे सोन्याचा मुलामा असलेले अत्यंत प्रतिष्ठित सन्मानचिन्ह मिळते. पुरस्कारासाठीचे नामांकन आणि विजेत्यांची निवड 'अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'च्या सदस्यांद्वारे केली जाते. परीक्षकांमध्ये अभिनेते, लेखक, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचा समावेश असलेल्या पाच विविध समित्या असतात. पुरस्काराची अधिकृत घोषणा होईपर्यंत विजेत्यांची नावे गुप्त ठेवली जातात. पुरस्काराचे सन्मानचिन्ह म्हणजे एक पुतळा आहे. त्यातील व्यक्ती चित्रपटाच्या रीलवर उभी आहे आणि तिने तलवार घेतली आहे. 

सन्मानचिन्हाची रचना प्रतिष्ठित कला दिग्दर्शक, सेड्रिक गिबन्स यांनी केली आहे. त्यानंतर त्याचे शिल्प सुप्रसिद्ध शिल्पकार जॉर्ज स्टॅन्ले यांनी तयार केले आणि त्यावर सोन्याचा मुलामा देऊन निर्मिती केली गेली.

पुरस्कार सोहळा हा अत्यंत शानदार पद्धतीने साजरा केला जातो. सोहळ्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींना जगभरातून निमंत्रित केले जाते. त्यांना त्यांच्या चित्रपटविषयक कामगिरीच्या आधारे 'बोर्ड ऑफ गव्हर्नर्स'द्वारे आमंत्रित केले जाते. लुई व्हिटॉन, फेंडी, गुची, डायर यांसारखे अनेक जगप्रसिद्ध 'ब्रँड' या सोहळ्यात सहभागी होतात आणि त्यांच्या फॅशनचे, कामाचे प्रदर्शन करतात. यावरून एक लक्षात घ्यायला हवे की, ऑस्कर पुरस्कार सोहळा हा केवळ चित्रपटांबाबत नसतो, तर त्याचप्रमाणे फॅशनसारख्या अनेक क्षेत्रांशी निगडित असतो.

भारतात अत्यंत मोठ्या लांबीचे म्हणजेच अधिक कालावधी असलेले चित्रपट तयार होण्याचा काळ म्हणजेच १९१२-१९१३ च्या काळापासून विचार केला, तरी आजवर ऑस्करमध्ये खूपच मोजक्या भारतीय चित्रपटांना आपले नाव झळकवता आले आहे. ऑस्करच्या ९५ वर्षांच्या इतिहासात केवळ १३ भारतीय चित्रपटांना आजवर नामांकन मिळाले आहे. ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा पहिला उल्लेख १९५७ मध्ये झाला होता. मेहबूब खानच्या 'मदर इंडिया'ला 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' श्रेणीमध्ये सन्माननीय स्थान मिळाले होते. १९६१ ते १९७९ या काळात चार डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म्सचा बोलबाला होता, पण त्या विजयी होऊ शकल्या नाहीत. इस्माईल मर्चंटचा 'द क्रिएशन ऑफ वूमन' (१९६१), फली बिलिमोरियाचा 'द हाऊस दॅट आनंदा बिल्ट' (१९६८), इशू पटेलचा 'बीड गेम' (१९७७) आणि केके कपिल आणि विधू विनोद चोप्रा यांचा 'एन एन्काउंटर विथ फेसेस' (१९७८) या त्या चार डॉक्युमेंटरी होत्या.

१९८३ मध्ये भारताला ऑस्करमध्ये पहिला विजय मिळाला. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ (१९८२) या चित्रपटातील कामासाठी ‘बेस्ट कॉस्च्युम डिझाइन’ या विभागातील 'ऑस्कर' जिंकणारे भानू अथैया हे पहिले भारतीय ठरले. १९८७ मध्ये, इस्माईल मर्चंटला त्याच्या 'अ रूम विथ अ व्ह्यू' या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा', 'सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन' आणि 'सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन' असे तीन पुरस्कार मिळाले. 

भारतीयांसाठी १९९२ हे वर्ष पुन्हा एकदा मैलाचा दगड ठरले. त्या वेळी सत्यजित रे यांनी जगातील चित्रपट निर्मात्यांवर आपला प्रभाव पाडला होता. त्यांना त्यांच्या कामासाठी ‘मानद पुरस्कार’ देण्यात आला. असा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय ठरले. सत्यजित रे यांच्या पुरस्काराची घोषणा अभिनेता ऑड्रे हेपबर्न यांनी केली होती. त्यांनी रे यांच्या कामाचे वर्णन " रे यांचे चलचित्रांच्या कलेतील प्रभुत्व दुर्मीळ असून, त्यांनी जगभरातील चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांवर अमिट प्रभाव पाडला असून, त्यांचा प्रगल्भ मानवतावाद आदर्श आहे!", असे केले होते. रे यांनी त्यांच्या निधनाच्या एक महिन्यापूर्वी प्रकृती अत्यंत गंभीर असताना हॉस्पिटलच्या बेडवर पुरस्कार स्वीकारला होता. 

एकविसाव्या शतकात ऑस्करसाठी नामांकन मिळालेले अधिक सिनेमॅटिक हिट्स पाहिले तर त्यात आशुतोष गोवारीकरचा 'लगान' (२००१), अश्विन कुमारचा 'लिटिल टेररिस्ट' (२००४), डॅनी बॉयलचा 'स्लमडॉग मिलेनियर' (२००८) आणि डॉयलेच्या '१२७ अवर्स' (२०११) साठी ए आर रहमान यांचा समावेश आहे. त्यात रहमानने ‘स्लमडॉग मिलेनियर’ आणि ‘जय हो’साठी ‘बेस्ट ओरिजिनल स्कोअर’ आणि ‘बेस्ट ओरिजनल सॉंग’ असे दोन ऑस्कर जिंकले.

आता खूप वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा ऑस्कर जिंकले आहे आणि यावेळी एस. एस. राजामौली यांच्या ‘नाटू नाटू’ या ‘आरआरआर’ चित्रपटातील गीताला हा सन्मान मिळाला आहे. हा विजयदेखील ऐतिहासिक आहे, कारण ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ जिंकणारे हे भारतीय निर्मितीचे पहिलेच गाणे ठरले आहे.

आपल्या सर्वांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आहे. या पुढेही भारतीय दिग्दर्शक व निर्मात्यांकडून असेच अत्यंत प्रभावशाली चित्रपट निर्माण व्हावेत, यासाठी आपण त्यांना पाठिंबा देण्याची व गरज पडल्यास सक्रिय योगदान देण्याची आवश्यकता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story