राजकारणातील पक्षविरहित ‘मैत्र’ हरवले

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी (दि. २९) दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 10:49 am

राजकारणातील पक्षविरहित ‘मैत्र’ हरवले

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी (दि. २९) दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून राजकारणात सक्रिय झालेल्या गिरीश बापट यांचे सर्वच पक्षातल्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी आपुलकीचे संबंध होते. बापट यांच्या निधनाने राजकारणातील पक्षविरहित मैत्र हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय मतभेदापलिकडचे ऋणानुबंध जोपासणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. टेल्को कंपनीत १९७३ ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून बापट यांनी राजकारणात प्रवेश केला. तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा आमदार म्हणून विजयी झाले होते.  राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर २०१९ मध्ये बापट पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.

अलीकडील काळात राजकारणातील वातावरण कलुषित झालेले असताना पक्ष, विचार बाजूला सारत सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या बापटांची उणीव अधिक भासणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला आणि गिरीश बापट यांचे त्रिकुट पुणेकरांना भावले होते. हे त्रिकूट GAS या टोपणनावाने प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे, सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट यांनी महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले.  पक्षीय राजकारणासोबतच पुणेकर म्हणून इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवताना बापटांनी सर्वसमावेशक राजकारण केले. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब त्यांच्याकडे होते.  

सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध कसे असावे, याचे आदर्श उदाहरण म्हणजे गिरीश बापट होते. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.  सर्वांना सहज उपलब्ध होणारा नेता, पक्ष, विचारसरणी यापलीकडे जात सौहार्द जोपासणारा नेता म्हणून पुणेकरांनी त्यांच्यावर प्रेम केले. बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील पक्षविरहित 'मैत्र' हरवल्याची भावना जुनेजाणते पुणेकर व्यक्त करीत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story