रस्त्याचा ‘रात्रीचा खेळ’ उठतो नागरिकांच्या जीवावर

महापालिकेच्या रेंगाळत जाणाऱ्या कामाचा अनुभव शहरात दररोजच नागरिक घेत आहेत. सिंहगड कॉलेज परिसरात गेल्या महिनाभरापासून रोज रात्री कामाचा खेळ सुरू आहे. मात्र, अत्यंत कूर्मगतीने काम सुरू असल्याने जीव मुठीत घेऊन नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 10:52 am
रस्त्याचा ‘रात्रीचा खेळ’ उठतो नागरिकांच्या जीवावर

रस्त्याचा ‘रात्रीचा खेळ’ उठतो नागरिकांच्या जीवावर

सिंहगड कॉलेज परिसरात महिनाभरापासून सुरू असलेल्या कामाने नागरिक त्रस्त

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

महापालिकेच्या रेंगाळत जाणाऱ्या कामाचा अनुभव शहरात दररोजच नागरिक घेत आहेत. सिंहगड कॉलेज परिसरात गेल्या महिनाभरापासून रोज रात्री कामाचा खेळ सुरू आहे. मात्र, अत्यंत कूर्मगतीने काम सुरू असल्याने जीव मुठीत घेऊन नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.

आंबेगाव येथील शिवसृष्टीकडून सिंहगड महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहतूक असते. रहिवासी आणि विद्यार्थ्यांची येथे कायम वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा रस्ता मानला जातो. सिंहगड कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरच्या रस्त्यावर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने मोठमोठे खड्डे घेत हे काम सुरू आहे. चार ते पाच फूट खोल असलेल्या या खड्ड्यांमुळे निम्म्याहून अधिक रस्ता  कमी झाला आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी येथे वाहतूक कोंडी होते. वाहन सुरक्षितपणे नेण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते. वाहनांच्या वर्दळीमुळे शेजारी लावलेले बॅरिकेड्स धक्का लागून अनेकदा खड्ड्यात पडतात. प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन जलदगतीने काम करावे, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.  

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये संगणकशास्त्र शिकणारा विद्यार्थी आदित्य डोंगरगे म्हणाला, ‘‘किमान तीन आठवड्यांपासून हे काम सुरू आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरदेखील मोठे खड्डे खोदले होते. ते आता बुजवले असून, त्यापुढे दुसरा खड्डा खोदला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम ठप्प पडलेले दिसत आहे. येथे वाहनांची सतत वर्दळ असते. त्याचबरोबर शैक्षणिक संकुलामुळे विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे तातडीने काम मार्गी लावले पाहिजे.’’

स्थानिक रहिवासी आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आशिष भोसले म्हणाले, ‘‘सिंहगड कॉलेज परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होऊन जवळपास महिना झाला असेल. रात्रीच्या वेळेस काम केले जाते. अनेकदा पहाटेपर्यंत काम सुरू असते. शैक्षणिक संकुलामुळे इथे वाहनांची प्रचंड वर्दळ असते. वाहनांच्या रेट्यामुळे अनेकदा धक्का लागून बॅरिकेड खड्ड्यात पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याचे भान ठेऊन प्रशासनाने वेगाने काम मार्गी लावणे आवश्यक आहे.’’

‘‘हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कामामुळे रस्ता निमूळता झाला आहे. महापालिका प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्याने सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर येऊन पाहणी करावी. त्यानंतर कामाला लागत असलेला वेळ योग्य की अयोग्य याचा निर्णय घ्यावा,’’ अशी मागणी स्थानिक रहिवासी अभिजित नागपुरे यांनी केली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story