Humanity : वृत्तपत्र विक्रेत्याने जपली माणुसकी

हल्ली धावपळीच्या युगात आपल्या अवतीभवती काय घडते याचे सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी वगैरे संकल्पना बोलण्यापुरत्याच मर्यादित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्र विक्रेत्याने रस्त्यावर आढळलेल्या बेवारस मनोरुग्ण महिलेची विचारपूस करत तिची वृद्धाश्रमात व्यवस्था केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 27 Apr 2023
  • 07:27 am
वृत्तपत्र विक्रेत्याने जपली माणुसकी

वृत्तपत्र विक्रेत्याने जपली माणुसकी

पुलावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या मनोरुग्ण महिलेची वृद्धाश्रमात रवानगी

#शिवणे

हल्ली धावपळीच्या युगात आपल्या अवतीभवती काय घडते याचे सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी वगैरे संकल्पना बोलण्यापुरत्याच मर्यादित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्र विक्रेत्याने रस्त्यावर आढळलेल्या बेवारस मनोरुग्ण महिलेची विचारपूस करत तिची वृद्धाश्रमात व्यवस्था केली आहे.    

वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर रुग्णालयासमोरील पुलावर एक ज्येष्ठ महिला तीन दिवसांपासून बसलेली आढळली होती. या रस्त्यावरून दिवसभरात हजारो वाहने ये-जा करत असतात. मात्र यातील एकाही जणांचे लक्ष या ज्येष्ठ महिलेकडे गेले नाही. त्यामुळे कोणीही ही महिला कोण आहे, ती तिथे का बसली आहे, याची चौकशी केली नाही. दरम्यान कोथरूड येथील वृत्तपत्र विक्रेते बजरंग लोहार यांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी सदर महिलेची विचारपूस केली.मात्र या महिलेला बोलता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोहार यांनी तिला पाणी पाजले, चहा-बिस्कीट दिले. बजरंग लोहार यांनी तिची माहिती  सोशल मीडियावर माहिती टाकून तिला मदत मिळावी, असे आवाहन केले. सदरची पोस्ट 'हेल्प रायडर' ग्रुपचे सदस्य बाळासाहेब ढमाले यांनी घेतली व त्वरित वारजे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. वारजे पोलिसांच्या मदतीने बाळासाहेब ढमाले, बजरंग लोहार यांनी महिलेला पौड येथील स्वामिनिवास वृद्धाश्रमात नेण्यात आले. हेल्प रायडर ग्रुपमधील गोपाळ जांभे यांच्या रुग्णवाहिकेतून तिला वृद्धाश्रमात नेण्यात आले. रात्री उशिरा महिलेला वृध्दाश्रम सोडण्यात आले. दरम्यान अशी संवेदनशीलता जपणारे वृत्तपत्रविक्रेते बजरंग लोहार यांच्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. लोहार यांनी पुढाकार घेतला आणि बाळासाहेब ढमाले यांनी माणुसकीच्या भावनेतून या महिलेला निवारा मिळवून दिला आहे.

मी नेहमीच या रस्त्यावरून ये-जा करत असतो. मला ही महिला तीन दिवसांपासून एकटी बसलेली आढळली, तिचा अपघात होऊ नये, यासाठी तिच्याबद्दलची पोस्ट मी सोशल मीडियावर टाकली आणि मदतीचे आवाहन केले. हेल्प रायडर संस्थेने त्वरित दखल घेत महिलेला वृद्धाश्रमात पोहचवण्याची व्यवस्था केल्याचे बजरंग लोहार म्हणाले आहेत.

महिला आमच्या 'स्वामीनिवास' वृद्धाश्रमात सुरक्षित आहे, ती मनोरग्न असल्याप्रमाणे वागत आहे. अद्याप तिची ओळख पटू शकली नाही. तिच्या कुटुंबाबद्दल पोलीस तपास करत असल्याचे 'स्वामीनिवास'च्या पदाधिकारी गौरी धुमाळ यांनी सांगितले आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story