‘पाणी’बाणी हटली
नितीन गांगर्डे
मांजरी बुद्रुक येथे वास्तव्यास असणारी द्रौपदा महादू आळंदकर ही ७५ वर्षांची वृद्धा पाण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वणवण करत होती. पाण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज केले, दाद मागितली. मात्र, त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. द्रौपदा यांच्या वणवणीला ‘सीविक मिरर’ने २३ फेब्रुवारीच्या अंकात वाचा फोडली. त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्यांना दोन हजार लिटरची पाण्याची टाकी दिली आहे. यामुळे पाण्यासाठीची पायपीट थांबली असून याबद्दल त्यांनी ‘सीविक मिरर’ चे मनापासून आभार मानले.
द्रौपदा या मांजरी बुद्रुक येथील गोडबोले वस्तीत राहतात. नागरिकरणामुळे येथील वस्ती वाढण्यापूर्वी येथे शेती होती. शेतात राहात असताना त्यांची पाण्याची गरज शेतातील विहिरीवर भागायची. २०२१ साली भावकीच्या वादात त्यांची बोअरवेल आणि विहीर बुजवण्यात आली. तेव्हापासून त्यांना पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी मिळत नव्हते. मांजरी बुद्रुक येथे पूर्वी ग्रामपंचायत होती. गेल्या वर्षी हा भाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केला गेला. नागरिकरण आणि पुणे महापालिकेत समावेश झाला तरी येथे पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नव्हत्या. पाण्यासाठी द्रौपदा यांच्या प्रमाणे अनेकांना वणवण करावी लागत होती. द्रौपदा यांच्या पतीचे आणि मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे त्या घरी एकट्याच असतात. वय ७५ वर्षे असल्याने वयाप्रमाणे काही ना काही व्याधी मागे लागते. एकाकी अवस्थेत कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करत असताना त्यांना पाणी मिळवण्यासाठी दररोज पायपीट करावी लागत होती.
आंघोळ, कपडे, भांडी आदी वापराच्या पाण्यासाठी त्यांना दूर अंतरावरील सोसायटीतून पाणी आणावे लागत होते. वृद्धत्वामुळे चालायला त्रास होत असतानाही पाण्याच्या शोधात त्यांना दररोज भटकंती करावी लागत होती.
घरी पाण्याचा नळ मिळावा म्हणून द्रौपदा यांनी महानगरपालिकेकडे २२ जुलै २०२२ रोजी अर्ज केला होता. परंतू त्यांच्या अर्जाची कोणी दखलही घेतली नाही. त्यानंतर त्यांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी 'लोकशाही दिनात' आपला हा प्रश्न मांडला. त्यावरही काही उपाययोजना झाली नाही. महापालिका हद्दीतील एकाकी वृद्धेला पाण्यासाठी दररोज दोन कि. मी. ची पायपीट करावी लागत असल्याची वस्तुस्थिती "पाणीबाणी" नावाने ‘सीविक मिरर’ ने २३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आणली. त्यानंतर प्रशासनाने द्रौपदा यांना पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या टाकीत टँकरने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे द्रौपदा यांची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे.
पाणी हेच जीवन असे म्हटले जाते. जगण्यासाठीच्या अत्यावश्यक बाबीत त्याचा समावेश होतो. पुण्यासारख्या शहरात प्रतिमाणसी सरासरी दोनशे लिटर पाण्याचा वापर होतो. मात्र, अशाच शहरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला पाण्यासाठी दररोज दीड-दोन किलोमीटर भटकंती करावी लागते ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. विलंबाने का होईना द्रौपदा यांचा पाण्याचा प्रश्न सुटला याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अनिल भांडवलकर यांनी व्यक्त केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.