पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज
आज जग झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणविषयक बदलाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (बीएसआय) या संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. आपला बहुमोल ठेवा असणारी आपली जैवविविधता जोपासण्यासाठी बीएसआयने 'मिशन लाईफ प्रोग्रॉम' हे अभियान हाती घेतले आहे.
या अभियानाअंतर्गत बीएसआयकडून पर्यावरणाला पोषक जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जागतिक पर्यावरणदिनानिमित्त बीएसआयने या अभियानात सहभागी होण्यासाठी हे आवाहन केले आहे.
मिशन लाईफ (लँडस्केप इंटिग्रेटेड फंक्शनल इकोसिस्टम) अभियानाच्या माध्यमातून आपल्या जैवविविधतेने नटलेल्या भूरचनाचे संरक्षण, संवर्धन करून आपली परिसंस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आपल्या जमिनीच्या वापरासंबंधीच्या चुकीच्या सवयी सोडून त्यांच्या शाश्वत वापराला चालना देणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
भारतातील विविध वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील प्राणीसृष्टी जपण्यासाठी, त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बीएसआयकडून सातत्याने शास्त्रीय संशोधन केले जाते, जैवविविधता मूल्यांकन कार्यक्रम राबवले जातात, याखेरीज प्रत्यक्षात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते.
या प्रकारे बीएसआय देशभरातील जैवविविधतेच्या संरक्षण, संवर्धनासाठी मोलाचा वाटा उचलते. मात्र लाईफ मिशन अभियानाच्या माध्यमातून बीएसआयच्या या परिसंस्था संवर्धनाच्या कामाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, या कामाला चळचळीचे स्वरूप प्राप्त करून देणे आणि त्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचे काम केले जाते.
स्थानिक समूह, स्वतंत्र काम करणारे गट, पर्यावरणविषयक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींचा समन्वय साधत बीएसआय हे काम करत आली आहे. असा सर्वसमावेशक दृष्टिकोनच पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकेल, परिसंस्थेच्या, पर्यावरणाच्या संवर्धनाकडे दमदार वाटचाल करू शकेल, असा बीएसआयचा विश्वास आहे.
या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त मिशन लाईफ या अभियानाला सर्वांचेच पाठबळ लाभणे अनिवार्य आहे. आपल्या उद्याच्या भविष्यासाठी विविधतेने नटलेली निसर्गसंपदा सांभाळणे, जोपासणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे येत्या काळात आपण प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा करूयात आणि आपली परिसंस्था समृद्ध करूयात, असे आवाहन
बीएसआयचे संशोधक डॉ. ए. बेन्नीअमीन यांनी केले आहे.