तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडेना

कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील खुल्या जीममध्ये एका तरुणाचा अचानक मृत्यू झाला. तरुणाच्या दोन्ही पायांवर जखमा असून, एक पाय चांगलाच भाजला आहे. नातेवाईक आणि नागरिक म्हणतात की विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. महावितरणने मात्र विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 22 Mar 2023
  • 10:49 am
तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडेना

तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडेना

नागरिक म्हणतात विजेच्या धक्क्याने मृत्यू, महावितरणने मात्र दावा फेटाळला; ससूनने राखून ठेवले मृत्यूमागील कारण

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील खुल्या जीममध्ये एका तरुणाचा अचानक मृत्यू झाला. तरुणाच्या दोन्ही पायांवर जखमा असून, एक पाय चांगलाच भाजला आहे. नातेवाईक आणि नागरिक म्हणतात की विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. महावितरणने मात्र विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यातच ससून रुग्णालयाने मृत्यूबाबतचे आपले मत राखून ठेवल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

अमोल शंकर नकाते (वय २४, रा, दौलत पेट्रोल पंप, भूगाव, पुणे) या तरुणाचा सोमवारी (२० मार्च) रात्री आठच्या सुमारास संयुक्त भुसारी कॉलनी मित्रमंडळाच्या जागेतील ओपन जीममध्ये मृत्यू झाला. नकाते भूगावमध्ये राहण्यास असला तरी तो भुसारी कॉलनी मित्रमंडळाचा कार्यकर्ता होता. तो दररोज सायंकाळी व्यायामासाठी, मित्रांना भेटण्यासाठी ओपन जीमजवळ यायचा. सोमवारीही तो मित्रांना भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी ओपन जीममधील एका व्यायामाच्या लोखंडी साहित्याजवळ गेला. त्यावेळी तो तोल जाऊन पडला. जवळच त्याचे मित्रही होते. अमोल पडल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याला तातडीने कोथरूडमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. ओपन जीम शेजारी लघुदाब वीजवाहिनी आहे. त्याला लागूनच ओपन जीमचे साहित्य ठेवलेले आहे. त्याच ठिकाणाहून भूमिगत लघुदाब वीजवाहिनी गेली आहे. ससूनमधील शवविच्छेदन  करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यूचे कारण आणि जखमांचा उल्लेख अहवालात केला नसल्याने भुसारी कॉलनीतील नागरिक संतप्त झाले आहेत.

विजेशी खेळणाऱ्या अमोलचा विजेनेच केला घात ?

अमोलने आयटीआयमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स केला आहे. त्याला विजेच्या उपकरणांची आवड असल्याने त्याने इलेक्ट्रिकल उपकरणे पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मोठमोठ्या कार्यक्रमांना लेझर लाईट आणि इतर साहित्य पुरवण्याचे काम तो करीत होता. मात्र, विजेशी नेहमी खेळणाऱ्या विजेनेच त्याचा घात केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी 'सीविक मिरर'शी बोलताना केला. याबाबत अमोलचा मित्र अथर्व साळुंके म्हणाला, अमोल माझा लहानपणापासूनचा मित्र होता. सोमवारी रात्रीदेखील आम्ही सोबतच होतो. त्याला फोन आला म्हणून तो ओपन जीमच्या साहित्याकडे गेला. तिथे तो बोलत असताना एकदम कोसळला. पडल्याचा आवाज आल्याने आम्ही धावलो. त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांना त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. भुसारी कॉलनीतील रहिवासी शशी कुडतरकर म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून ओपन जीम येथे आहे. त्याच्या खालूनच वीजवाहिनी गेली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजवाहिनी चांगली असल्याचे सांगितले आहे. ही वाहिनी जमिनीखाली किती खोल टाकली आहे, तिच्यात काही दोष तर नाही ना याची पोलीस आणि आमच्यासमोर महावितरण अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशी मागणी आम्ही अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अमोलच्या मृत्यूस वीजवाहिनी कारणीभूत असल्याचा आरोप झाल्यानंतर मंगळवारी महावितरणच्या विद्युत निरीक्षकांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले. संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या खुल्या जागेत एका पदपथावर ओपन जीम आहे. त्याच पदपथाच्या एका बाजूला रोहित्र असून, दुसऱ्या बाजूला मिनी फिडर पिलर आहे. या दोन्ही दरम्यान ३० मीटर लांबीची भूमिगत वीजवाहिनी आहे. नागरिकांच्या उपस्थितीत केलेल्या प्राथमिक पाहणीत व चाचणीत ओपन जीमच्या कोणत्याही उपकरणात विजेचा प्रवाह नसल्याचे दिसून आले. तसेच, फ्यूज देखील व्यवस्थित होता. नागरिकांच्या मागणीनुसार भूमिगत वीजवाहिनीची केबल टेस्टिंग व्हॅनद्वारे तपासणी करण्यात आली. त्यातही बिघाड आढळला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

न्यायवैद्यक अहवाल महत्त्वाचा

अमोल नकातेच्या पायावरील जखमांची त्वचा राखून ठेवली आहे. ही त्वचा विश्लेषणासाठी पाषाण जवळील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. शॉक लागलेल्या व्यक्तीच्या शरीरात लोहकण आढळून येतात. न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तसेच शरीरावरील जखमांचा उल्लेख सविस्तर अहवालात असेल. प्राथमिक अहवालात इतर कारणही दिलेले नाही. शवविच्छेदन करणारे डॉक्टर एकतर प्राथमिक कारण 

देतात किंवा सखोल तपासणी करायची शिफारस करतात, अशी माहिती ससूनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story