गायब गोठ्यांचे गूढ

दिवसेंदिवस कमी होत गेलेली शहरातील मोकळी जागा, गोठे शहराबाहेर हटवण्याचे पुणे महानगरपालिकेचे अधिकृत धोरण, त्यातच उद्भवलेली दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव आणि इतरही अनेक कारणांमुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता नामशेष झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 1 Apr 2023
  • 07:13 am
गायब गोठ्यांचे गूढ

गायब गोठ्यांचे गूढ

आरोग्यास अपायकारक गोठे केशवनगरच्या नदी काठावर स्थलांतरित करूनही कल्पनातीत जागा शोधून व्यवसाय सुरू, डेक्कन ते कल्याणीनगर पसरले जाळे

तन्मय ठोंबरे/ विजय चव्हाण 

tanmay.thombre/vijay.chavan@civicmirror.in

TWEET@tanmaytmirror/VijayCmirror

दिवसेंदिवस कमी होत गेलेली शहरातील मोकळी जागा, गोठे शहराबाहेर हटवण्याचे पुणे महानगरपालिकेचे अधिकृत धोरण, त्यातच  उद्भवलेली दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव आणि इतरही अनेक कारणांमुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता नामशेष  झाले. परिणामी जनावरे राखणाऱ्या गुराख्यांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली. शहरातील गाय, म्हैस, बैल, घोडे आणि शेळ्यांसह इतर पाळीव प्राणी हद्दपार झाले.  शहरातील गोठे लष्कर भागात किंवा थेट केशवनगरच्या नदी काठावर कायमचे स्थलांतरित करण्यात आले, पण असे असले तरी अधिकाऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटावेत आणि कारवाई होऊ नये म्हणून अनेकांनी कल्पनेतही नसतील अशा जागा शोधून काढून असे अनेक गोठे कम् आडोसे शहराच्या अगदी मध्यभागी म्हणजे डेक्कन जिमखाना आणि कल्याणीनगर भागात उभे केले आहेत. 

शहरातील सगळ्याच प्रसिद्ध अशा पुलांवरून गेला नसेल असा माणूस विरळाच. पण त्या पुलाखाली अनेक वर्षे हे जनावरांचे आसरे सुखनैवपणे ठाण मांडून आहेत. अगदी कल्यणीनगर आणि कोरेगाव पार्कला जोडणा-या आगाखान पुलापासून ते म्हात्रे पुलापर्यंत ही साखळी तयार झाली आहे.     

सीविक मिररच्या प्रतिनिधीने या संदर्भात पाहणी केली असता, कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क दरम्यान आगाखान पुलाखाली १० ते १२ म्हशी बांधलेल्या दिसल्या. या म्हशींसाठी खाली जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद आणि कचऱ्याने भरलेला आहे. या बांधलेल्या म्हशींजवळ त्यांचे मालक पत्ते खेळताना दिसले. कचऱ्याच्या दुर्गंधीबरोबरच या म्हशींच्या मूत्राचा आणि शेणाचा वास सर्वत्र पसरला असल्याची तक्रार आजूबाजूच्या नागरिकांनी केली. 

संगमवाडी येथील पुलाखाली ४ म्हशी, २ गायी आणि ४ वासरे बांधलेली आढळली. म्हशी जवळच्या झाडांना बांधून ठेवलेल्या दिसल्या. 

वासरांसाठी लोखंडी पत्र्याचे शेड काळजी घेणाऱ्यांनी बनवले आहेत. कचऱ्यातच पुलाच्या कुंपणाला गायी बांधलेल्या दिसल्या. 

 पूना हॉस्पिटलच्या पुलाखालच्या एका लहान पाणी नसलेल्या कालव्यात १२ ते १५ शेळ्या आणि २  गायी दिसल्या. या गायी उसाचे पाचट, गवत आणि कडबा-कुट्टीच्या साठ्यालगत बांधलेल्या होत्या. ओंकारेश्वर मंदिराजवळ नदीपात्राकडे २ घोडे बांधलेले आहेत. घोड्यांबरोबरच रथ, घोडे सजावटीचे साहित्य पडून आहे. जखमी घोड्याची मलमपट्टीसुद्धा तिथेच होत असल्याचे दिसून आले.

भिडे पुलाजवळ अंदाजे २० ते २५ म्हशी नदीपात्रात गवत खाताना दिसून आल्या. या म्हशी रस्त्यावर येत असल्यामुळे रस्ताही घाण होतो. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा रस्ता निसरडा होतो. या म्हशी नदीच्या पात्राजवळील रस्त्यावर येऊन बसतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीही होते, अशी माहिती जवळपासच्या दुकानदारांनी दिली. बालगंधर्व पुलाखाली ३ गायी बांधून ठेवल्या होत्या. सोबतच मोठ्या प्रमाणात पाळीव कबुतरांच्या ढाबळीदेखील होत्या. 

झेड ब्रिजखाली जवळपास ७ घोडे बांधलेले आहेत. ते तिथे अशाप्रकारे बांधलेले आहेत की रस्त्यावरून जाताना ते सहज दिसत नाहीत. झेड ब्रिजवरून पाहिल्यावर पुलाखाली घोडे बांधलेले दिसून येतात, घोड्यांबरोबरच पुलाखाली टांगा आणि लग्नाचे रथदेखील पडून आहेत. या घोड्यांची काळजी घेणारे मालक बांधलेल्या घोड्यांजवळ दारू पिताना दिसून आले. महापालिकेसमोरील नदीपात्रामध्ये ११ गायी दिसून आल्या. काही झाडाला तर काही कुंपणाला बांधून ठेवलेल्या होत्या. एस. एम. जोशी पुलाखाली २ गायी आणि वासरे झाडाला बांधून ठेवलेली होती. 

दुग्ध व्यवसायात पिढ्यानपिढ्या असलेले सहदेव गवळी (खरे नाव नाही) म्हणाले, "आजच्यासारखी पाणी आणि चारा टंचाई पूर्वी नव्हती. हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळायचा. चाऱ्याच्या पेंडीचे भाव सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे होते. पाच-दहा रुपयात हिरव्यागार लुसलुशीत गवताचा भारा मिळायचा. परंतु, चारा आणि इतर वस्तूंमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई यामुळे गुरांची आणि गोठ्यांची संख्या कमी झाली आहे. अशा पद्धतीने जनावरे लपवून आम्ही व्यवसाय करीत आहोत. शहराबाहेर जाऊन व्यवसाय करणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया सहदेव यानी व्यक्त केली. 

जनवाडीत राहणारे महेश म्हणाले, "आषाढ महिन्यात बोकडांना मागणी असते. झोपडपट्टीत माणसांना टेकायला जागा नाही, तिथे शेळ्या कुठे बांधणार. पुन्हा चोरी होण्याची  शक्यता, त्यामुळे पुलाखाली छोटा गोठा बनवला. रात्री मी इथे येऊन झोपतो. सकाळी तासभर आणि संध्याकाळी तासभर मुले येऊन जातात."

महापालिकेने शहरात पशुपालन करणार्‍यांना मुंढवा-केशवनगर येथे गोठ्यांसाठी जागा दिल्या आहेत. परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात पशुपालनाऐवजी अनधिकृतपणे बांधकामे करून अन्य व्यवसाय सुरू आहेत. आम्ही परंपरागत गवळी असलो तरी आम्हाला अशा जागा दिल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया मोहन यांनी व्यक्त केली. 

नाव न सांगण्याच्या अटीवर आरोग्य विभागातील अधिकारी म्हणाले, "शहराच्या  मध्यवर्ती भागांमध्ये गाई, म्हशींसारखी गुरे पाळणार्‍या सर्वांनाच महापालिकेने केशवनगर येथील महापालिकेच्या जागेमध्ये गोठ्यांसाठी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. या ठिकाणी अनेक गोठे मालकांनी जागा घेतली आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणचे बहुतांश गोठे बंद झाले असून त्या ठिकाणी पक्के बांधकाम करून अन्य व्यवसायच सुरू करण्यात आले आहेत. यामुळे महापालिकेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. असे लोकच आपल्या गुरांसाठी अशा पुलाखालच्या जागा बनवत तर नाहीत ना हेही तपासावे लागेल. दिलेल्या जागांवर आता त्या ठिकाणी पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय होतो का याची तपासणी करण्यात आलेली नाही. लवकरच या ठिकाणी सर्वेक्षण करून पुढील कारवाई करण्यात येईल," असेही अधिकारी म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story