The 'Missing' Story : द 'मिसिंग' स्टोरी

सध्या देशभरात 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून वातावरण तापलेले असतानाच मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ६१० मुली बेपत्ता झाल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही पुणे व परिसरातून ४४७ मुली व महिला हरवल्या असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील हरवलेल्या मुली, महिलांचा विषय आता ऐरणीवर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Wed, 17 May 2023
  • 10:41 am
द 'मिसिंग' स्टोरी

द 'मिसिंग' स्टोरी

'द केरला स्टोरी' चे कथानक काही असले तरी हरवलेल्या मुलींच्या संख्येत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण राज्यात पहिल्या क्रमांकावर असून तीन महिन्यांतच तब्बल ४४७ मुली बेपत्ता आहेत; परदेशी गेलेल्या महिलांचाही संपर्क तुटला.

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

सध्या देशभरात 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून वातावरण तापलेले असतानाच मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ६१० मुली बेपत्ता झाल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही पुणे व परिसरातून ४४७ मुली व महिला हरवल्या असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील हरवलेल्या मुली, महिलांचा विषय आता ऐरणीवर आला आहे.

एकट्या पुणे शहरात १४८ मुली बेपत्ता आहेत, पिंपरी-चिंचवड परिसरातून १४३ मुली हरवल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर पुणे ग्रामीणमधून १५६ मुली हरवल्या असल्याची नोंद मागच्या तीन महिन्यात (जानेवारी-फेब्रुवारी-मार्च) करण्यात आली आहे.  पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ८२ महिला परदेशी गेल्या असून त्यांच्याशी कुठलाच संपर्क राहिला नसल्याने त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त होते आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील ५ हजार ६१० मुली महिला हरवल्या असल्याची नोंद आहे. यातील काहींचा शोध लागला असला तरी या प्रकारे महाराष्ट्रासारख्या आणि त्यातही सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे व परिसरातून मुली हरवण्याचे प्रकार ही धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे २०२० पासून महाराष्ट्रात हरव लेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय महिला नोकरीच्या आमिषाने ओमानमध्ये नेल्यावर तेथे अनेक महिलांवर अत्याचार होत असल्याचा प्रकार 'सीविक मिरर'ने उघडकीस आणला होता. त्यांनतर आयोगाने यासाठी दिल्लीतील विविध देशांच्या दुतावासाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर मुली व महिलांचे बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.

गेल्या तीन महिन्यात १६ ते २५ वयोगटातील ५ हजार ६१०  तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या असून त्यांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करून शोधमोहिम राबवावी आणि दर पंधरा दिवसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आय़ोगास सादर करावा, अशी सुचना राज्य महिला आयोगाने गृह विभागाला केली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी सोमवारी (१५ मे) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मुली व महिला मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत असून यात १६ ते ३५ वयोगटातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्र पोलिस, गृह विभाग या बेपत्ता महिलांच्या तपासासाठी करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोग कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्य गौरी छाब्रीया, सुप्रदा फातर्पेकर, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिपक पांडे, कायदा व सुव्यवस्था अप्पर पोलीस महासंचालक सुहास वारके, पोलिस उपायुक्त डॉ. स्वामी, गृह विभागाचे सह सचिव राहुल कुलकर्णी, महिला आयोगाच्या आय़ोगाच्या उपसचिव दिपा ठाकूर, विधीज्ञ विरेंद्र नेवे उपस्थित होते. 

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, राज्यातून महिला व मुली बेपत्ता होणे ही चिंतेची बाब आहे. आयोग ५ जानेवारी २०२२ पासून विविध यंत्रणांशी संपर्क करुन याबाबत पाठपुरावा करत आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महिला आयोग महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग यांना याबाबतची माहिती महिला आयोगाने दिली आहे.

यंत्रणा फक्त कागदावरच?

राज्य महिला आयोग सातत्याने या बाबत पाठपुरावा करत असल्याने महिलांना आमिष दाखवून परदेशी पाठवणाऱ्या मुंबईतील साकीनाका भागातील दोन एजंट विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ही मोठी यंत्रणा असल्याने याविरोधात ठोस कारवाई करण्याची गरज आहे. राज्यातील मिसिंग सेल, अनेक जिल्ह्यातील भरोसा सेल हे केवळ कागदावरच आहेत ही वस्तुस्थिती असल्याचेही चाकणकर म्हणाल्या आहेत. महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने समिती स्थापन करत शोध मोहिम राबवावी तसेच या मोहिमेअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर १५ दिवसांनी आयोगाला सादर करावा, अशी सूचना त्यांनी गृह विभागाला केली आहे.

या जिल्ह्यांतून इतक्या तरुणी बेपत्ता

अहमदनगर १८४, अकोला ४१, अमरावती शहर ३१, अमरावती ग्रामीण ६३, औरंगाबाद शहर ६६, औरंगाबाद ग्रामीण ५२, बीड २७, भंडार २३, मुंबई शहर ३८३, बुलढाणा ७६, चंद्रपूर १०१, धुळे ४५, गडचिरोली १३, गोंदिया ४६, हिंगोली १४, जळगाव १२१, जालना ३६, कोल्हापूर १२७, लातूर ४२, मीरा-भाईंदर ११३, नागपूर शहर १०८, नागपूर ग्रामीण १६९, नांदेड ३६, नंदुरबार ३७, नाशिक शहर ९३, नाशिक ग्रामीण १६९, नवी मुंबई ७५, उस्मानाबाद ३४, पालघर २८, परभणी २७, पिंपरी चिंचवड १४३ पुणे शहर १४८ आणि पुणे ग्रामीण १५६ व इतर.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story