मास्तर उठला विद्यार्थ्याच्या जिवावर
# जुन्नर
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एका शिक्षकाने दिव्यांग, गतिमंद विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील धामणखेल या गावात हा प्रकार घडला असून या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एका दिव्यांग आणि गतिमंद असलेल्या मुलाला शाळेतील शिक्षकाने आणि कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक विकास बाजीराव घोगरे आणि कर्मचारी सुभाष दिलीप ठोकळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
जुन्नर तालुक्यातील धामणखेल येथे विशेष मुलांची शाळा आहे. किरकोळ कारणावरून या शाळेतील शिक्षकाने आणि कर्मचाऱ्याने या शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग आणि गतिमंद मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल घेत जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
पीडित मुलगा हा गतिमंद आणि दिव्यांग आहे. त्याने नुकताच या शाळेत प्रवेश घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलाच्या डाव्या हातावर जखमांचे व्रण आहेत. या मुलाला शाळेतील लोखंडी पाईपने डाव्या हाताच्या खांद्यावर, उजव्या पायाच्या घोट्यावर आणि इतर ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये मुलाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास जुन्नर पोलिसांकडून करण्यात येत आहेत. या प्रकरणी हेमंत जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.