आपत्तीची ओढ, पुन्हा सुरू टेकडी फोट

हिमालयाच्या पर्वत रांगांतील हिमाचल प्रदेशात झालेल्या अवैध बांधकामांमुळे गेल्या काही दिवसांत भूस्खलन, पूर, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते वाहून जाणे यामुळे राज्यभर विनाशपर्व सुरू झाले आहे. राज्याच्या विविध भागात अजूनही अनेक पर्यटक अडकून पडले असताना मृतांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Fri, 14 Jul 2023
  • 12:12 am
आपत्तीची ओढ, पुन्हा सुरू टेकडी फोट

आपत्तीची ओढ, पुन्हा सुरू टेकडी फोट

कात्रज डोंगररांगेतील शिंदेवाडी डोंगरावर पुन्हा एकदा लचकेतोड, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याला आडवी बांधण्यात आलेली भिंत तोडली, अवैध कामे सुरू

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

हिमालयाच्या पर्वत रांगांतील हिमाचल प्रदेशात झालेल्या अवैध बांधकामांमुळे गेल्या काही दिवसांत भूस्खलन, पूर, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते वाहून जाणे यामुळे राज्यभर विनाशपर्व सुरू झाले आहे. राज्याच्या विविध भागात अजूनही अनेक पर्यटक अडकून पडले असताना मृतांची संख्या ८८  वर पोहोचली आहे.  

अशा प्रकारच्या घटनांपासून कोणताही धडा न घेतल्याने पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज डोंगररांगेतील शिंदेवाडी डोंगरावर पुन्हा एकदा लचकेतोड सुरू झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याला आडवी बांधण्यात आलेली भिंत तोडण्यात आली आहे. शासनाच्या ताब्यात असलेल्या येथील जागेतूनच टेकडीवर जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून बांधकाम साहित्याची वाहतूक करून टेकडीवर काही बांधकामेही झाली आहेत. एकूणच भविष्यात टेकडीफोड होऊ नये म्हणून शासनाने येथे भिंत बांधून खबरदारी घेतली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत या ठिकाणी पुन्हा सावळा गोंधळ सुरू झाला आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भविष्यात पुन्हा दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

भोर तालुक्याचा भाग असलेल्या शिंदेवाडी येथील डोंगरावर २०१३ मध्ये मोठ्या प्रमाणात टेकडीफोड झाली होती. त्यामुळे पावसाचे पाणी वाहण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलून पावसाचे पाणी थेट पुणे-सातारा महामार्गावर आले होते. या पाण्याच्या लोंढ्यामध्ये विशाखा व संस्कृती वाडेकर या मायलेकींचा मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेऊन महसूल प्रशासनाने शिंदेवाडीमधील डोंगर फोडणाऱ्यांवर कारवाई केली होती, पण आता पुन्हा परिस्थिती जैसे थे बनली आहे. 

अतिक्रमण होऊ नये आणि टेकडीफोड टाळावी यासाठी शिंदेवाडी टेकडीची काही जागा शासनाने लिलाव करून ताब्यात घेतली होती. तसेच भविष्यात पुन्हा टेकडीफोड होऊ नये म्हणून येथील टेकडीवर जाणाऱ्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याशी संलग्न रस्त्याला आडवी भिंत बांधण्यात आली होती. महसूल विभागाच्या सूचनेनुसार डोंगरावर जाणाऱ्या रस्त्याला आडवी भिंत बांधून सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्ता बंद केला होता.

याबाबत जांभूळवाडी येथील रहिवासी मनोज वाखारे म्हणाले की, "दुसऱ्या एका मोठ्या संकटाकडे आता वाटचाल सुरू आहे. डोंगरावर खासगी मालकीच्या जागा असल्याने वर मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू झाली आहेत.  जेसीबीचा वापर सर्रास सुरू असून टेकड्या वेगाने फोडल्या जात आहेत. पावसाळा आला की या भागातून जाणे म्हणजे धस्स होते. प्रशासन हे थांबवू शकते; पण इच्छाशक्तीचा अभाव आणि अधिका-यांशी असलेले साटलोटे यामुळे काहीही बदल होताना दिसत नाही.

सदानंद राऊत हे म्हणाले की, " या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डोंगरांवरील पाण्याचे नैसर्गिक स्रोत मोकळे करण्याची कार्यवाही प्रशासनाने केली होती. तसेच पाणी वाहून जाण्यासाठी महामार्ग व डोंगरालगत चर खणण्यात आले. तसेच महामार्गालगतचे बेकायदा रस्ते बुजवण्याची कारवाई करण्यात आली. प्रांत अधिकाऱ्यांनी शिंदेवाडी परिसराची पाहणीही  केली होती. डोंगरावरील नैसर्गिक ओहोळ, ओढे-नाल्यांची अवस्था, पाणी वाहून जाण्याची क्षमता, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामे याचा अहवाल त्यांनी तयार केला. तात्पुरत्या उपाययोजना केल्यानंतर पुन्हा टेकडीफोड सुरू झाली. जांभूळवाडी व शिंदेवाडी भागातील डोंगरांवर जाण्यासाठी महामार्गावरून बेकायदा रस्ते पुन्हा उभारण्यात आले आहेत. हे रस्ते महसूल प्रशासनाने बुजवले नाहीत. तथापि, महामार्गावरून डोंगरावर जाण्यासाठी जोडरस्ता केल्यास संबंधितांवर सार्वजनिक उपद्रव केल्याबद्दल कारवाई होईल, ही अपेक्षा फोल झाली आहे. पुन्हा एकदा शिंदेवाडी किंवा अंबिल ओढ्याची पुनरावृत्तीची वाट पाहायची का?" असेही ते म्हणाले.  

भोरचे तहसीलदार सचिन पाटील म्हणाले, "शासनाच्या जागेत असलेला रस्ता तसेच पाडण्यात आलेली भिंत याची पाहणी करून विस्तृत पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच टेकडीवर झालेल्या बांधकामासंदर्भात ''पीएमआरडीए''शी पत्रव्यवहार करण्यात येईल."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story