वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा
पुणे ग्रामिण जिल्हा पोलिस आणि लोणावळा विभागाच्या वतीने ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’, या मोहिमे अंतर्गत गडकिल्ले स्वच्छता अभियाने राबवण्यात येणार आहे. हे अभियान बुधवारी (दि. २६ एप्रिल २०२३) लोणावळा उपविभागातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळी राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये सहयाद्रीच्या कुशीमध्ये नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत असे नयनरम्य सौदर्यात येथील गडकिल्ले भर घालत आहेत. देशविदेशातुन अनेक पर्यटक व गिर्याप्रेमी नेहमीच या गडकिल्यांना भेटी देण्यासाठी येत असतात. त्यामुळे मावळाचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्यांची तसेच बौध्दकालीन लेण्यांची स्वच्छता राखणे व त्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य समजुन पुणे ग्रामिण जिल्हा पोलिस आणि लोणावळा विभागाने “वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा”हे अभियान राबविण्याचे ठरवले आहे.
या अभियांतर्गत लोणावळा उपविभागातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांची पोलीस, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, पत्रकार, स्वच्छता केली जाणार आहे. बुधवार सकाळी ०६:३० वाजल्यापासुन या अभियानाची सुरूवात होईल. तर अभियानाच्या दुसऱ्या टप्यामध्ये प्रत्येक आठवडयातील एक दिवस गडकिल्ले व लेण्यांची स्वच्छता केली जाणार आहे.
यात किल्ले लोहगड, किल्ले विसापुर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, किल्ले राजमाची, याचबरोबर कार्ला लेणी, भाजे लेणी, टायगर पॉईन्ट, लायन्स पॉईन्ट, राजमाची पॉईन्ट, भुशी डॅम व सर्वात शेवटी पर्यटन पंढरी लोणावळा शहराची देखील स्वच्छता केली जाणार आहे.