गळती सापडली नाही पण कार खड्ड्यात
राजानंद मोरे
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाजवळ बुधवारी सकाळी एक कार पाणीपुरवठा विभागाने खोदलेल्या खड्ड्यात पडली. मागील चार-पाच दिवसांपासून भलामोठा खड्डा खोदण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत होता. तरीही कामाला वेग येत नव्हता. कारच्या अपघातानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले अन् मागचा पुढचा विचार न करता त्यांनी थेट हा खड्डा बुजवून टाकला. ज्या कारणासाठी हा खड्डा खोदला होता, ते तसेच गाडले गेले अन् पालिकेचे अधिकारी-कर्मचारी निघून गेले.
क्षेत्रीय कार्यालयाकडून सिंहगड इन्स्टिट्यूटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. क्षेत्रीय कार्यालयाच्या दिशेने जाताना एक कार थेट खड्ड्यात पडली. त्यामध्ये दोन-तीन प्रवासी असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. सुदैवाने ते सर्वजण सुखरूप असून कसलीही दुखापत झालेली नाही. खड्ड्याचा अंदाज न आल्याने कार पडल्याचे सांगितले जात आहे. कारचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. मागील चार-पाच दिवसांपासून सांडपाण्याच्या पाईपमध्ये होत असलेल्या गळतीच्या दुरुस्तीसाठी हा खड्डा खोदण्यात आला होता. अपघातानंतर काही तासांतच खड्डा पुन्हा बुजवण्यात आला. याविषयी माहिती सांगताना परिसरातील रहिवाशी सुरज मोरे यांनी सांगितले की, हा खड्डा मागील काही दिवसांपासून तसाच होता. तात्पुरते बॅरिकेड्स लावण्यात आले होते. अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता त्याने व्यापला होता. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी रस्ता अपुरा पडत होता. परिणामी, अनेकदा वाहनांच्या रांगा लागायच्या. सकाळी धावण्यासाठी मी या रस्त्याने जात असताना खड्डा तसाच होता. अर्धा तासाने परत आलो तेव्हा कार खड्ड्यात पडली होती. त्या कारमध्ये तिघे तरुण होते, असे समजते. त्यांना दुखापत झाली नाही. पण हा खड्डा धोकादायकच होता. रस्ता खचून कार खड्ड्यात गेली असावी. पालिका प्रशासनाकडून वेळीच काम पूर्ण न केल्याने हा अपघात झाल्याचेही मोरे यांनी नमूद केले.
दरम्यान पावसाळ्यातील तुंबलेले पाणी किंवा मैला वाहून नेणाऱ्या पाईपमध्ये गळती होत होती. त्याच्या दुरुस्तीसाठी खासगी ठेकेदाराला काम देण्यात आले होते. त्यांच्याकडून हा खड्डा खोदण्यात आला होता. याविषयी पाणीपुरवठा विभागातील उप अभियंता नितीन खुडे म्हणाले, २४ बाय ७ योजनेसाठी पाईपाईन टाकण्यात आली आहे. तिथेच पावसाळी व मैला वाहून नेणाऱ्या पाईपमध्ये गळती झाली आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये जाऊ शकते. त्यामुळे गळती दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. पण नेमकी गळती कुठे होत आहे, याचा शोध लागत नव्हता. गळती होत असल्याने ते शोधणे गरजेचे होते. त्यासाठी खड्डा तसाच ठेवण्यात आला होता. त्याकडेला बॅरिकेड्स लावण्यात आली होती. त्यामुळे तसा वाहनांना धोका नव्हता, पण हा अपघात कसा झाला, हे सांगू शकत नाही. तिथे जाण्यापूर्वी अपघातग्रस्त वाहन आधीच काढण्यात आले होते. ते वाहन कुणाचे होते, हेही माहिती नाही. पण अपघातानंतर रस्ता तातडीने बुजवण्यात आला असून गळती दुरुस्तीचे काम नंतर केले जाईल. त्याचा पाणीपुरवठ्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचेही खुडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अपघातानंतर प्रशासनाने गळतीची दुरुस्ती न करताच खड्डा बुजवला. त्यामुळे त्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. आता पुन्हा काही दिवसांनी खोदकाम केले जाणार आहे. तोपर्यंत गळती होत राहणार आहे. जवळच ड्रेनेजच्या नवीन चेंबरचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गळती बंद होईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र तोपर्यंत गळती सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.