कुलकर्णी कुटुंबीयांचे डोळे लागले खार्टूमकडे
अनुश्री भोवरे
anushree.bhoware@punemirror.com
TWEET@Anu_bhoware
सुदानमध्ये मागच्या काही दिवसांपासून नागरी संघर्ष सुरू असून या संघर्षाची झळ भारतासह अनेक देशांतील नागरिकांना बसली आहे. पुण्याच्या वाघोली परिसरात एक लहानशी मुलगी सतत सुदानच्या खार्टूममधील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. ती घराच्या दाराकडे डोळे लावून बसली आहे, कारण ती वाट पाहतेय, तिच्या वडिलांची काही बातमी कळेल का, ते सुरक्षित आहेत का, ते घरी कधी परतणार आहेत, अशा अनेक प्रश्नांचे काहूर तिच्या मनात माजले आहे. ही चिंता केवळ तिच्या एकटीची नसून तिच्या घरातील प्रत्येकाला याच काळजीने घेरले आहे.
वाघोली येथील या मुलीचे वडील संदीप सुरेश कुलकर्णी (वय ४३) हे सध्या सुदानमध्ये अडकले आहेत. त्यांच्या काळजीपोटी मागच्या दहा दिवसांपासून संपूर्ण कुलकर्णी कुटुंबाची झोप उडाली आहे. यात संदीपच्या पत्नी, त्यांचे आई-वडील, भाऊ, त्यांच्या मुली सगळे सतत संदीप मायदेशी कधी परत येणार, या एकाच गोष्टीची वाट पाहात आहेत. त्यांचे सगळे लक्ष मोबाईलवर खिळलेले आहे. संदीपचा आवाज ऐकण्यासाठी त्यांचे प्राण कंठाशी आलेले आहेत. कारण मागच्या काही दिवसांत त्यांचे संदीपशी रीतसर बोलणेच झालेले नाही. ते सतत दूरदर्शनवरील सुदानसंबंधित प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत.
मूळ वाघोलीचे संदीप कुलकर्णी हे एका खासगी कंपनीत बॅटरी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. मागच्या सहा वर्षांपासून कुलकर्णी खार्टूम येथे वास्तव्यास आहेत. इतर अन्य भारतीयांप्रमाणेच आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी संदीप यांनीही कुटुंबासाठी ही नोकरी पत्करलेली आहे.
कुलकर्णी कुटुंबाची ही अस्वस्थता संदीप यांचे भाऊ अभिजित कुलकर्णी यांनी 'सीविक मिरर'कडे व्यक्त केली आहे. मागच्या दहा दिवसांपासून सुदानमध्ये नागरी संघर्षातून हिंसाचार सुरू आहे. संदीपची खुशाली कळेल यासाठी आम्ही कुठलेच प्रयत्न करणे सोडलेले नाही. सुदानमधील भारतीय दूतावासाला आतापर्यंत शेकडो मेल पाठवल्यानंतर अजून त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही सगळेच प्रचंड तणावाखाली आहोत. वृत्तवाहिन्यांवर सुदानमधील ताज्या घडामोडी बघण्याशिवाय आमच्याकडे अन्य पर्याय उरलेला नाही.
माझा भाऊ संदीप सुदानमधील अतिशय प्रतिकूल भागात अडकलेला आहे. जिथे वीज, पाणी आणि संवादाची साधनेच उपलब्ध नाहीत. संघर्ष सुरू झाल्यापासून त्याच्याशी कधीतरी काही सेकंद बोलणे झाले आहे, तेवढेच. मागच्या दोन दिवसांपासून तर त्याचा कसलाच संपर्क होत नाही. यामुळे आमच्या घरात सगळेच चिंताक्रांत झाले आहेत. आई (६६ वर्षे), वडील (७३ वर्षे), संदीपच्या पत्नीने खाणे-पिणेच सोडून दिल्यामुळे तिची प्रकृतीही बिघडली आहे. माझ्या दोन्ही पुतण्यांचे (संदीपच्या मुली) सतत फोनकडे लक्ष लागलेले असते. न जाणे आता फोन येईल आणि बाबांची खुशाली कळेल, ही एकमेव अपेक्षा त्यांना लागलेली आहे.
संदीप ज्या परिसरात वास्तव्यात आहे, तिथे मागील दहा दिवस तरी खाद्यपदार्थांची कमतरता नव्हती. संदीप ज्या घरी राहतो तिथे त्याच्यासोबत सातजण राहतात. यातील दोघे पुण्यातील, एकजण मुंबईतील, एक गोव्यातील व बाकीचे अन्य ठिकाणचे आहेत. संदीप मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात घरी आला होता. त्यानंतर तो २० मार्च २०२३ ला सुदानमध्ये परत गेला. त्यावेळी तिथे असा काही हिंसाचार सुरू होईल आणि घराशी संपर्कही साधणे मुश्किल होईल, याची त्यालाच काय कोणालाही कल्पना नव्हती.
आपल्या माध्यमातून भारत सरकार, सुदानमधील भारतीय दूतावास, परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार या सगळ्यांना विनंती आहे, त्यांनी संदीपला मायदेशी सुखरूप परत आणावे, अशी विनंतीही अभिजित कुलकर्णी यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.