द केरला धमकी स्टोरी
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, त्यामुळे आता दोन गटांमध्ये वाद भडकला आहे. त्यात अर्थातच एक गट चित्रपटातील गोष्टी सत्य असून, त्या सर्वांसमोर याव्यात यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, तर दुसरा गट मात्र विरोधात आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदीतील एका रिक्षाचालकाने चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना रिक्षाप्रवास मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याला आता देशभरातून धमकीचे फोन येत असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे.
द केरला स्टोरी या चित्रपटासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांसाठी मोफत रिक्षा चालवण्याची घोषणा रिक्षाचालक साधू मगर यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे कौतुकही केले जात होते. मात्र, आता केरळ आणि अन्य राज्यातून आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचे मगर यांनी सांगितले असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
महिला तस्करी, जिहाद, लव्ह जिहाद अशा विविध पातळ्यांवर भाष्य करणारा द केरला स्टोरी हा चित्रपट देशभरात शुक्रवारी (५ एप्रिल) प्रदर्शित झाला. यापूर्वी साधू मगर या आळंदी-मरकळ भागात राहणाऱ्या रिक्षाचालकाने त्याच्याकडून हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना मोफत रिक्षाप्रवास दिला जाईल, असे घोषित केले होते. त्याचबरोबर आळंदी भागातून फोन करणाऱ्या पहिल्या दहा महिलांना चित्रपटाचे तिकीट आणि प्रवास दोन्ही मोफत असेल असे पोस्टरही त्यांनी आपल्या रिक्षाच्या मागे लावून, तो फोटो फेसबुकवर अपलोड केला होता.
साधू यांची फेसबुक पोस्ट अवघ्या काही तासांत देशभरात व्हायरल झाली. अगदी अमेरिकेतूनदेखील साधू यांचे कौतुक करणारे फोन आले. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी साधू यांचा फोटो ट्विट करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक आणि अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली. साधू यांनी पोस्टरवर स्वत:चा मोबाईल नंबरही लिहिला होता, तसेच रिक्षाच्या बाजूला उभे राहून त्यांनी आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे साधू यांना दिवसभरात शेकडो फोन येणे सुरू झाले. त्यामध्ये कौतुक करणारे फोन येत असतानाच नंतर धमकी, अश्लील शिवीगाळ होऊ लागली. काहींनी त्यांना 'तुमच्या बापाच्या पैशातून हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे का?' असा जाब विचारणारेही फोन केले. अखेर काही स्थानिकांच्या सूचनेनंतर साधू यांनी आळंदी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना साधू यांनी दिलेल्या माहितीनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. साधू यांनी यापूर्वी 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटासाठीदेखील प्रवास करणाऱ्यांना मोफत रिक्षासेवा दिली आहे.
दहा बाय बाराच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत मगर कुटुंब राहते. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याचे मूळचे असणारे मगर कुटुंबीय १५ वर्षांपूर्वी आळंदी-मरकळ येथे राहण्यास आले आहेत. साधू मगर यांच्या दोन मुलांचे शिक्षण दहावी-बारावीपर्यंत झाले असून, ते पुढील शिक्षणाची तयारी करीत आहेत. केवळ चित्रपटासाठीच नाही, तर वर्षभर भारतीय सैन्य दलातील कोणत्याही जवानास रिक्षाप्रवास करायचा झाल्यास साधू मगर यांच्याकडून मोफत रिक्षा उपलब्ध करून दिली जाते.
हातावर पोट असताना केवळ धर्मासाठी आपण हे सगळे करीत असल्याचे साधू मगर यांचे म्हणणे आहे. 'मी जवानांना, शाळकरी मुलांना मोफत सेवा देतो. काश्मीर फाईल्स वेळी मी माझा मोबाईल नंबर अशाप्रकारे जाहीर केला नव्हता. परंतु, आता द केरला स्टोरीसाठी मोबाईल नंबर असलेली पोस्ट फेसबुकवर अपलोड केल्यानंतर मला महाराष्ट्रासह कर्नाटक, केरला, पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेशसह देशभरातून आणि अमेरिकेतूनही फोन आले आहेत. बहुतांश लोकांनी माझे कौतुक केले. मात्र, मला अनेकांकडून धमक्यादेखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी मी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, असे साधू यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.