कलाटेंमुळे मिळाली ‘काट्या’च्या लढतीला कलाटणी

बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेली मते पाहता 'कलाटेंनी वाजवल्या राष्ट्रवादीच्या शिट्ट्या' असे म्हणण्याची वेळ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. महाविकास आघाडीच्या पराभवाला काही अंशी कारणीभूत ठरलेल्या कलाटे यांना मात्र स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 06:43 am
कलाटेंमुळे मिळाली ‘काट्या’च्या लढतीला कलाटणी

कलाटेंमुळे मिळाली ‘काट्या’च्या लढतीला कलाटणी

अश्विनी जगतापांच्या विजयाला हातभार पण स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यात आले अपयश

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेली मते पाहता 'कलाटेंनी वाजवल्या राष्ट्रवादीच्या शिट्ट्या' असे म्हणण्याची वेळ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. महाविकास आघाडीच्या पराभवाला काही अंशी कारणीभूत ठरलेल्या कलाटे यांना मात्र स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही.

शिट्टी चिन्ह घेऊन कलाटे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उतरले होते. ऐनवेळी बाहेरील उमेदवार नको म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक अकराजणांनी आमच्यातील कोणाही एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत कलाटे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. त्यानंतर शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना उमेदवारी दिली, तर कलाटे यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर करून बंडखोरीचा इरादा कायम ठेवला होता. बंडखोरीचा आम्हाला फरक पडणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते सांगत होते. परंतु, नाना काटे आणि कलाटे यांच्या मतांची बेरीज करायची झाल्यास ती नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या मतांपेक्षा ७ हजार ९३६ ने जास्त आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने ऐनवेळेस पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हा भाजप-शिवसेना महायुतीचे विजयी उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात त्यांना १ लाख २२ हजार मते मिळाली होती. त्यामुळे कलाटे हे पोटनिवडणुकीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, आयात उमेदवार नको म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केलेला विरोध कलाटे यांच्या वर्मी बसला होता. ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेल्याने कलाटे यांनी महाविकास आघाडीकडून नेमण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आमदार सुनील शेळके तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर बोचऱ्या आणि शेलक्या शब्दांत टीका केली होती. कलाटे यांना तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नाराज गटाने त्यांना आतून मदत केल्याचे दिसून आले, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून काहीअंशी छुपा पाठिंबा असतानाही कलाटे यांना ५० हजार मतांच्या आतमध्ये रोखण्यात भाजपला यश आले. त्याचबरोबर नाना काटे यांना देखील एक लाखांचा टप्पा गाठण्यापासून भाजपने रोखले.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजप शिवसेना महायुतीच्या अश्विनी लक्ष्मण जगताप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. प्रचारात सर्वच पातळीवर आघाडी गाठल्याने आणि नियोजनात सुसूत्रता आणण्यासाठी केलेली कामे एकसंघपणे नागरिकांपर्यंत पोहचवण्यात भाजप नेते यशस्वी ठरले. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडीकडून प्रचाराचा मुद्दा बनवला गेला. मात्र, भाजपने राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी संधी द्या म्हणून केलेला प्रचार विजय मिळवण्यासाठी मोलाचा ठरला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते स्वतःच्या उमेदवाराचा प्रचार कमी आणि कलाटे कसे बंडखोर हे सांगण्यात वेळ घालवताना दिसून आले.

कलाटे यांची बंडखोरी फायद्याची ठरली का, असा सवाल नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना केला असता, आम्ही केलेली विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढल्याचे सांगून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. भाजपच्या विजयाची अनेक कारणे सांगितली जात असताना कलाटे यांची बंडखोरी हे महाविकास आघाडीच्या पराभवाचे एक प्रमुख कारण मानले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story