भटक्या कुत्र्यांचा प्रश्न विधानसभेत पोहोचला
सीविक मिरर ब्यूरो
पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. भटकी कुत्री लहान मुले, महिला, वृद्धांसह दुचाकीस्वारावर हल्ले करत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. यावेळी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. ही समिती कडक नियम तयार करेल असे आश्वासन राज्य सरकरातर्फे देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी वडगाव शेरीतील ब्रह्मा सन सिटी या सोसायटीत भटक्या कुत्र्यांनी सोसायटीमध्ये खेळत असलेल्या एका सहा वर्षांच्या मुलावर हिंसक हल्ला केला. कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग करत केलेल्या हिंसक हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना ‘सीिवक िमरर’ने ८ फेब्रुवारीच्या अंकात ठळकपणाने मांडली होती. त्याची दखल घेऊन पािलका प्रशासनाने ब्रह्मा सनसिटीत कारवाई करून तेथील भटक्या कुत्र्यांना तेथून हलवून िनरीक्षणाखाली ठेवले होते. अशा प्रकारच्या घटना केवळ वडगाव शेरीत घडल्या नसून खराडी, चंदन नगर, संपूर्ण शहरात जागोजागी घडल्या आहेत. भटक्या कुत्र्यांची दहशत हा शहरातील एक गंभीर प्रश्न असून त्यामध्ये प्राणीप्रेमी आणि सामान्य नागरिक असे दोन गट या ना त्या निमित्ताने वारंवार आमने-सामने येत असतात. भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाचे हात बांधलेले असल्याने ते तेवढ्यापुरती कारवाई करतात. मात्र, भटक्या कुत्र्यांची दहशत काही संपत नाही.
पुणे शहरात सुमारे साडेतीन लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. एक वर्षात महापालिका हद्दीत १६ हजार ५६९ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. पण फक्त १७ हजार १७८ कुत्र्यांची नसबंदी केलेली आहे. नसबंदीचे प्रमाणही भटक्या कुत्र्यांच्या संख्येत अत्यल्प असल्याने हा प्रश्न तसाच लोंबकळत पडलेला आहे. सोसायट्यांमध्ये जसा हा प्रश्न आहे, तसाच रस्त्यावर, बागांमध्येही हा प्रश्न भेडसावत आहे. मोकळ्या जागांवर खेळणाऱ्या लहान मुलांवरही कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना, ज्येष्ठांना कुत्र्यांपासून सावध राहण्यासाठी हातात काठी घेऊन जावे लागते. तसेच रात्री, मध्यरात्री दुचाकीवरून जाणाऱ्यांचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेकदा अपघात झाले असून काही जणांना प्राणासही मुकावे लागले आहे. दुचाकीबरोबर चारचाकी वाहनांचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत.
शहराच्या विविध भागात प्राणीप्रेमी नागरिक कोणत्याही कारवाईस तीव्र विरोध करतात. मात्र, हे प्राणी जेव्हा त्रासदायक ठरतात त्यावेळी नागरिकांच्या स्थितीचा कोणीही विचार करत नाही. त्रासदायक ठरणाऱ्या कुत्र्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. महापालिकेने सोसायटीधारकांसाठी कडक नियमावली तयार करावी, अशी मागणी सभागृहात केली. यावर समिती तयार करून नियम तयार केले जातील असे आश्वासनही देण्यात आल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.