झुंड इन रिॲलिटी

शहरातील रेकॉर्डवरील आरोपी आणि गुन्हेगारीकडे झुकलेल्या अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झालेल्या ‘दिशा’ उपक्रमांतर्गत ११२ जणांना खेळाडू बनवण्याचा ध्यास एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Mon, 17 Jul 2023
  • 11:19 pm
झुंड इन रिॲलिटी

झुंड इन रिॲलिटी

गुन्हेगारीकडे झुकलेल्या, िनरीक्षणगृहात दाखल अल्पवयीन मुलांना दाखवली 'दिशा'; संदेश बोर्डे तयार करताहेत उद्याचे पेले, भुतिया, खेत्री, सरावासाठी पदरमोड करून नेमला प्रशिक्षक

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

शहरातील रेकॉर्डवरील आरोपी आणि गुन्हेगारीकडे झुकलेल्या अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झालेल्या ‘दिशा’ उपक्रमांतर्गत ११२ जणांना खेळाडू बनवण्याचा ध्यास एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने घेतला आहे. 'झुंड' या चित्रपटातील कथानकासारखाच प्रकार वास्तवात उतरला असून, निरीक्षण गृह व विशेष गृहात कैदी म्हणून असलेल्यांना जामीनावर सोडवून या इंजिनिअरने राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल मॅच खेळवल्या आहेत.

झुंड इन रिॲलिटीची अनुभूती सॉफ्टवेअर इंजिनिअर संदेश बोर्डे हे मिळवून देत आहेत. आयटी कंपनीतील प्रशिक्षक संदेश बोर्डे यांनी दर शनिवार आणि रविवारी निरीक्षणगृहात जाऊन निवड झालेल्या विधी संघर्षित मुलांना प्रशिक्षण देत आहेत. यामुळे आता राज्यासह देशपातळीवर उत्तम खेळाडू तयार होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे दररोज या मुलांचा खेळाचा सराव थांबू नये यासाठी पदरमोड करून बोर्डे यांनी एक स्वतंत्र प्रशिक्षकच नेमला आहे.  

 दोन दिवसांपूर्वी मासिक गुन्हे विषय बैठक पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी गुन्हे दाखल असणारे आणि गुन्हेगारीकडे वळत असलेल्या किशोरवयीन आणि अल्पवयीन मुलांसाठी 'दिशा' या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले.

गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या वाढत्या उद्दात्तीकरणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘उभरत्या' गुन्हेगारांची स्वतंत्र नोंद ठेवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेकॉर्ड नसणारे परंतु, गुन्हेगारीकडे झुकलेल्यांचा आकडा साडे सात हजारांपेक्षा जास्त असल्याचे यातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारीकडे झुकलेल्यांना आणि अन्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी, समुपदेशन आणि त्यांची आवड ज्या विषयात आहे तेथे त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम शहर पोलीस करीत आहेत. त्यातूनच बोर्डे यांच्या मदतीने खुनासह अन्य अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या विधीसंघर्षित मुलांना सामान्य मुलांसह खांद्याला खांदा लावून खेळाच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.

आंतरजिल्हा फुटबॉल मॅचसाठी पिंपरी-चिंचवडमधील निगडी ओटास्कीम येथील राहूलनगर झोपडपट्टीतील काही मुलांची निवड करण्यात आली होती. उच्चभ्रू कुटुंबातील मुलांसह या मुलांनाही टीममध्ये स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रातील उत्तम टीम म्हणून नावाजल्या गेलेल्या या मुलांसह राज्यातील इतर कारागृहात असणाऱ्यांनाही सामावून घेण्याचे ठरवण्यात आले. तेव्हा खुनाच्या गुन्ह्यात निरीक्षण गृह व विशेष गृहात असणाऱ्यासह देहूरोड येथे एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीलाही स्थान देण्यात आले. याकरीता न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन जामीन मिळवत या आरोपी असणाऱ्यांना आतंरराज्य मॅचसाठी निवडण्यात आले. खेळात विशेष आवड असणाऱ्यांना मुख्य प्रवाहात  आणण्याचे काम सध्या वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे.

कोवळ्या वयात हातून नकळत झालेल्या चुकांमुळे खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांना चार भींतीच्या आत दिवस काढावे लागत आहेत. परिणामी निराशेच्या

गर्तेत अडकलेल्यांना त्यांचे हरवलेले बाल्य मिळवून देण्यासाठी, त्यांना चार भिंतीतील अंधारमय आयुष्यातून मोकळ्या आकाशाखाली जगता यावे यासाठी  संदेश बोर्डे स्पोटर्स फाउंडेशन आशेचा किरण ठरत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, (निरीक्षण गृह व विशेष गृह) येरवडा येथील आठ मुले नागपुर येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत खेळली होती. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अनेक जण झटत आहेत. मार्च महिन्यात झालेल्या एका मॅचमध्ये तर खुनाचा गुन्हा दाखल असणाऱ्याला विशेष परवानगीने खेळासाठी ठराविक कालावधीसाठी जामीन मिळवण्यात आला होता. येरवडा निरीक्षण गृह व विशेष गृहाबरोबरीनेच गुन्हेगारीकडे झुकलेल्या अशा एकूण ११२ मुलांना सध्या फुटबॉलसह अन्य खेळांची आवड जोपासण्यासाठी पोलीस अधिकारीही व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करीत आहेत.

‘झुंड’ चित्रपट हा ज्या व्यक्तिरेखेच्या जीवनावर आधारीत तयार करण्यात आला आहे. असे प्रा. विजय बारसे यांनी १९ मार्च २०२२ रोजी या विधी संघर्षित बालकांची येरवडा निरीक्षण गृह येथे भेट घेतली होती. त्यावेळी प्रा. बारसे यांनी या बालकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले होते. फुटबॉल खेळात उत्तम कामगिरी करणाऱ्या मुलांना नागपूर येथे होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची व स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणार आहोत, असे आश्वासन बारसे यांनी दिले. त्यानंतर स्वतःवरील गुन्हेगार हा कलंक पुसून समाजापुढे पुन्हा ताठ मानेने उभे राहण्यासाठी संधी मुलांना उपलब्ध झाली.

विमाननगर येथे आयटी कंपनीमध्ये मी सध्या काम करीत आहे. चुकून, अजाणतेपणे, परिस्थितीवश गुन्हेगारीकडे झुकलेल्या या मुलांना समाजात कोणीच कफहानगल्या दृष्टीकोनातून बघत नाही. केवळ समाजच नाही तर अनेकदा आई-वडिलांनी देखील त्यांचा स्वीकार करण्यास नकार देत असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे आधीच दिशाहिन होत असलेल्या मुलांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात ते नक्कीच गुन्हेगारी क्षेत्रातच रममान होण्याची शक्यता असते. हा विचार करून मी त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला. सरावादरम्यान , प्रशिक्षणादरम्यान त्यांचे समुपदेशनही करण्याचा प्रयत्न केला. संधी मिळाल्यास ते नक्कीच यशस्वी होऊ शकतात, हेसुद्धा माझ्या लक्षात आले. माझी नोकरी सांभाळून हे काम करत आहे, माझा हा पुढाकार आवडल्याने अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असल्याची भावना संदेश बोर्डे यांनी व्यक्त केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story