मित्रांनी 'त्याच' जागी केला सराईताचा खून
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
ज्या जागेवर सराईत गुन्हेगाराने त्याच्या मित्रांवर प्राणघातक हल्ला केला होता, त्याच जागेवर त्याच्या मित्रांनी त्याला सात महिन्यांनी मरणासन्न अवस्थेत आणून टाकले व नंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासमोर (वायसीएम) शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.
आदर्श बलवंत सिंह (वय १९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील बलवंत हिम सिंह (५१, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल डोंगरे (२३, रा. वल्लभनगर, पिंपरी), सुशांत जाधव (२६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), सुशांत लष्करे (२४, रा. खराळवाडी, पिंपरी), अजिंक्य टाकळकर (२२, रा. मोशी), तसेच त्यांच्या इतर साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आदर्शला नग्न करून कमरेच्या पट्ट्याने, दांडक्याने मारहाण करून, तसेच धारदार व टोकदार हत्याराने भोसकून त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. आदर्श आणि आरोपी हे मित्र असल्याने आदर्श शुक्रवारी आरोपींसोबत गेला. त्यानंतर त्यांनी मद्यपान केले. दरम्यान, आरोपींनी आदर्शला मारहाण करून जखमी केले. त्यानंतर दुचाकीवरून त्याला वायसीएम रुग्णालयाच्या नवीन इमारतीसमोर सोडून आरोपी निघून गेले. शनिवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास आदर्शला जखमी अवस्थेत पाहून आरोपींपैकीच एकाने पोलिसांना फोन करून, एक व्यक्ती माझ्या दुकानाच्या दारात पडला असल्याची माहिती दिली. तसेच, आदर्शच्या वडिलांनादेखील फोन करून माहिती दिली. त्यामुळे पोलीस आणि आदर्शचे वडील वायसीएम रुग्णालयासमोर आले, तेव्हा पोलिसांनी आदर्शच्या वडिलांना 'तुम्हाला माहिती कोणी कळविली', हे विचारले असता, आरोपींपैकी एकाचे नाव उघड झाले. पोलिसांनी आदर्शला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आदर्श सिंह हा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. त्याला उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही कुटुंबीयांनी त्याच्या उच्च शिक्षणासाठी धडपड सुरू केली होती. तसेच, आदर्श याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात, तसेच आरोपींपैकी काही जणांवरदेखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आदर्शवर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांपैकी खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यातील जखमीला नोव्हेंबर २०२२ मध्ये वायसीएम रुग्णालयासमोरच मारहाण करण्यात आली होती. आरोपी आणि आदर्श हे मित्र होते. तसेच, या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने ते एकमेकांविरोधातील माहिती पोलिसांना देत असल्याचा संशय सर्वांना होता. त्यातूनच त्यांची भांडणेही झाली होती. त्यानंतर आता आदर्शचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींसह इतर काही जणांची नावे
पोलिसांना समजली असून, त्यानुसार तपास केला जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.