वणवे थांबेनात, टेकड्यांवरील वनवैभव भस्मसात
विजय चव्हाण
वाढत्या उन्हाबरोबरच टेकड्यांवर वणवा लागण्याच्या घटना वाढत असून, आधी कात्रज टेकडी आणि शनिवारी पहाटे कर्वेनगर परिसरातील वारजे वन उद्यान टेकडीला आग लागली. वाऱ्यासह पसरलेल्या आगीत अनेक झाडे आणि प्राणीजीव जळाले. त्यावेळी कोथरूड आणि वारजे अग्निशामक दलाच्या जवानांकडून तत्काळ घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आग सर्वत्र पसरली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. वारजे येथील कै. वसंत अर्जुन चौधरी अग्निशमन केंद्राची एक गाडी, कोथरूडची एक गाडी घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी वारजे वन उद्यान टेकडी आणि गांधी भवन डहाणूकर कॉलनी या परिसरातील टेकडीवरील आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांसह स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले.
या आगीमध्ये वनविभागासह काही खासगी जागेतील दोनशेहून अधिक झाडे जळून गेली. तर वन्यप्राण्यांनाही आगीची झळ पोहोचली. दत्तात्रय चौधरी यांच्यासह सिद्धेश्वर तरुण मित्र मंडळाचे गिरीश कुलथे, संकेत भोज, वनरक्षक गौतम टांकनसार, सचिन मांडवकर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. त्यामुळे आगीपासून होणारे नुकसान टळले.
मुक्तहस्ते ऑक्सिजन' देणारी झाडे आणि टेकड्यांचे अस्तित्वच आता काही उपद्रवी आणि नतद्रष्ट लोकांना नकोसे वाटते. त्यामुळेच या टेकड्यांना आग लावण्याचा प्रकार या कंटकांकडून होताना दिसत आहेत. . खरेतर उन्हाळ्यात या वणव्यांचे प्रमाण जास्त असते परंतु यंदा डिसेंबरमध्येच हे "मॅनमेड' वणवे पेटल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात सुमारे ७३ ठिकाणी वणवे लागल्याची नोंद वनविभागात झाली असून, त्यामुळे ३४० हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. सामान्यत: उन्हाळ्यात वणवे लागण्याचे प्रमाण जास्त असते. वणवे विविध कारणाने लागतात. झाडांचे खोड एकमेकांवर घासून होणाऱ्या घर्षणातून आगीची ठिणगी निर्माण होते, किंवा वीज पडूनही अनेक ठिकाणी वणवे पेटतात. परंतु शहरी भागात असलेल्या वनविहारांमध्ये, हिरव्यागार, ऑक्सिजन देणाऱ्या टेकड्या समाजकंटकांकडून पेटवल्या जातात. सुमारे ८० टक्के वणवे हे माणसांच्या चुकीमुळेच लागतात. या ठिकाणी जाऊन सिगारेट पिणे, शेकोटी पेटवणे, जाणूनबुजून आग लावणे असे प्रकार होताना दिसतात. नैसर्गिक वणव्यांचे प्रमाण १५ ते २० टक्केच असते. यामध्ये झाडे तर मरतातच परंतु त्यावर अधिवास असणारे प्राणी, पक्षी, कीटक यांचाही होरपळून दुर्दैवी मृत्यू होतो. करोना काळात नागरिकांना बाहेर पडताच येत नसल्याने सुदैवाने वणवा लागण्याचे प्रमाण नव्हते परंतु गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा हे अपप्रकार सुरू झाले असून, १३३ ठिकाणी वणवे लागल्याची नोंद वनविभागात करण्यात आली आहे. पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या टेकड्यांवर गेल्या काही दिवसांपासून वणव्याचे प्रकार घडत आहेत. त्यामध्ये सिंहगडच्या आजूबाजूच्या टेकड्या, वाघोली, कोंढवा भागातील टेकड्या, बावधन, भूगाव, पाचगाव पर्वती, वेताळ टेकडी यांचाही त्यामध्ये समावेश आहे.
पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील म्हणाले, "टेकड्यांवर नियमित फिरायला जाणाऱ्या आणि तेथे आजूबाजूला राहणाऱ्या जागरूक नागरिकांचा वनविभागाने व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. त्यावर माहिती मिळाल्यानंतर वनविभागाकडून तत्काळ "ॲक्शन' घेतली जाते. याशिवाय "सोशल मीडियावरही यामध्ये आता बरेच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. वणवे लागण्याला सुरुवात झाली आहे. तो कसा विझवावा याची कार्यशाळा वनविभागातील कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आली आहे. याशिवाय अशाप्रकारच्या घटना रोखता याव्यात यासाठी गेल्या वर्षी वनविभागाकडून "वणवा परिषद' आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पर्यावरणप्रेमी, टेकडी प्रेमी ग्रुप, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, टेकड्यांवर रोज चालायला जाणारे नागरिक यांचा समावेश केला होता. त्यांना देखील याविषयी माहिती देण्यात आली आहे."
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.