माळामारी

कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमात माळ घालून प्रवेश करण्यावरून बुधवारी ओशोभक्त आणि पोलिसांच्यात वादावादी झाली. या वादातून पोलिसांनी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांवर लाठीमार केल्याचा आरोप ओशोभक्तांनी केला आहे. गोंधळ आणि वादावादीमुळे ओशो आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. आश्रमाला छावणीचे स्वरूप आले होते. ओशोभक्तांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 23 Mar 2023
  • 04:32 pm
माळामारी

माळामारी

ओशोंच्या माळेवरून भक्त आणि पोलिसांत जुंपली; भक्तांचे रस्त्यावरच ठिय्या आंदोलन, पोलिसांनी केला लाठीमार

संपत मोरे

feedback@civicmirror.in

कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमात माळ घालून प्रवेश करण्यावरून बुधवारी ओशोभक्त आणि पोलिसांच्यात वादावादी झाली. या वादातून पोलिसांनी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांवर लाठीमार केल्याचा आरोप ओशोभक्तांनी केला आहे. गोंधळ आणि वादावादीमुळे ओशो आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. आश्रमाला छावणीचे स्वरूप आले होते. ओशोभक्तांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ओशो आश्रमात देशभरातून ओशोभक्त आले होते. याच भक्तांनी पोलीस आणि आश्रमाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी ओशो आश्रमात संबोधी कार्यक्रमासाठी भक्त गोळा झाले होते, त्यावेळी आत आश्रमात प्रवेश करताना गळ्यातील ओशो यांचा फोटो असलेली माळ काढून प्रवेश करण्याचे आवाहन व्यवस्थापन समितीने केले होते. या आवाहनानंतर भक्त चिडले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी हस्तक्षेप करत भक्त आणि व्यवस्थापन यांच्यात समेट घडवून आणला आणि माळ घालून प्रवेश करण्याची परवानगी मिळाली.

मंगळवारी दुसऱ्या गटाने माळ नको अशी भूमिका घेतल्याने व्यवस्थापनाने माळ घालून प्रवेश करायला बंदी घातली. यामुळे संतापलेल्या ओशो भक्तांनी विरोध सुरू केला. याचदरम्यान झालेल्या गोंधळात पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप केला जात आहे. ओशो यांच्यावर प्रेम करणारे भक्त या ठिकाणी येऊ नयेत म्हणून आश्रमाकडून अशी वागणूक दिली जात आहे. आमच्या गुरूचा फोटो असलेली माळ गळ्यात घालून प्रवेश देत नाहीत, ही संताप आणणारी गोष्ट आहे. या आश्रमाकडे कोणीही भक्त येऊ नये आणि हा आश्रम तोट्यात दाखवून बंद करण्याचा डाव आहे. त्यातून आश्रमाची मोक्याची जागा हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप पद्मिनी कांकरिया यांनी केला आहे.

धुळ्याहून आलेले देविदास पाटील म्हणाले, आम्ही दर्शनासाठी आत जायला नऊशे सत्तर रुपये मोजले आहेत, आम्ही आत जाताना आमच्या गुरूंचा फोटो असणारी माळ घालून जात असताना आम्हाला प्रवेश नाकारला. ज्यांच्या नावाने आश्रम आहे त्यांचा फोटो नको तर कोणाचा फोटो लावायचा, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.  

या सर्व घटनेबद्दल पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, इथे दोन गट आहेत, एक गळ्यात माळ घालून प्रवेश करणाऱ्यांचा आणि दुसरा माळ नको असे म्हणणारा. वरुण रावण नावाच्या एका तरुणाने सलग दोन दिवस इथे शांतताभंग होईल, असे वर्तन केले. त्याने पोलिसांनासुद्धा दमबाजी केली. त्याने इथल्या काही भक्तांना भडकवले. त्यामुळे गोंधळ झाला. त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story