कुटुंबाने गाठली क्रौर्याची परिसीमा

प्रेमात आडव्या येणाऱ्या आपल्या चिमुरडीचा आईने खून केल्याची घटना ताजी असतानाच दिघी येथे गर्लफ्रेंडला अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने आई तसेच भावाच्या मदतीने वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 7 Mar 2023
  • 11:55 pm
PuneMirror

कुटुंबाने गाठली क्रौर्याची परिसीमा

दिघीत मुलाकडून वडिलांचा खून, आई आणि भावाने केली मदत

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

प्रेमात आडव्या येणाऱ्या आपल्या चिमुरडीचा आईने खून केल्याची घटना ताजी असतानाच दिघी येथे गर्लफ्रेंडला अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने आई तसेच भावाच्या मदतीने वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अनिल अशोक जाधव (वय २३) आणि राहुल अशोक जाधव (वय २५) यांना दिघी पोलिसांनी अटक केली असून, पत्नी रेखा अशोक जाधव हिच्यावरदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर अशोक रामदास जाधव (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि नंतर शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. ही आत्महत्या नसून खून असल्याचे उघडकीस आल्यावर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

अनिल याचे गावाकडील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीबद्दल अशोक यांनी अपशब्द वापरले होते. याचाच राग येऊन अनिलने घरातील दोरीने गळा आवळून अशोक यांचा खून केला. यावेळी फरशीवर पडलेले रक्ताचे डाग रेखा हिने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर राहुलने मृतदेह घरातील फॅनला अडकवून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला.

खून केल्यानंतर अशोक यांनी आत्महत्या केल्याचा बनाव कुटुंबाने रचला. बराच कालावधी गेल्यावर अशोक यांना शेजारील लोकांच्या मदतीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून पुढे सरकारी हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तेथे कोणीच न थांबता कुटुंब घरी निघून गेले. काही वेळाने मोठा मुलगा राहुल हा हॉस्पिटलमध्ये परत आला.

प्रौढ व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तर पोलिसांचे एक पथक अशोक यांच्या घरी दाखल झाले. जाधव कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने आत्महत्या केली असताना त्यांची पत्नी आणि मुलगा गावाकडे निघून गेले. त्यामुळे पोलिसांना संशय वाटला. तसेच शवविच्छेदन करताना हा खून असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तुम्हा दोघांना यावे लागेल, असे अनिल आणि रेखा यांना सांगितले. हे दोघे आल्यानंतर अशोक यांचा मृतदेह दिला जाईल, असे राहुल याला सांगून पोलिसांनी त्याला थांबवून ठेवले.

घटनेनंतर अनिल आणि रेखा हे यवत या मूळ गावी जायला निघाले होते. मात्र, पोलिसांनी फोन करून बोलावून घेतल्याने ते अर्ध्या रस्त्यातून परत आले. दोघे हॉस्पिटलमध्ये दाखल होताच पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनी खून केल्याचे कबूल करून त्यामागील कारण सांगितले. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक करून रेखा हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story