जवळ बॉम्ब असल्याचे सांगत अख्खे विमानतळ धरले वेठीस
सीविक मिरर ब्यूरो
विमानतळावर एका ७२ वर्षीय महिलेने ‘‘माझ्या चारही बाजूंना बॉम्ब आहेत,’’ असे सांगून विमानतळावर खळबळ उडवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी विमानतळावरील सीआयएसएफच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या आजीबाईंची तपासणी केली असता त्यांच्याकडे कोणताही बॉम्ब आढळून आला नाही. विमानतळावर तपासणी सुरू असताना आजीबाईंचे बोलणे ऐकून प्रवाशी प्रचंड घाबरले होते. मात्र तपासणी केल्यावर त्यांच्याकडे काहीच आढळून आले नाही. त्यावेळी ‘‘मी गम्मत केली,’’ असे उत्तर आजीबाईंच्या तोंडून निघाल्यावर विमानतळाचे अधिकारी, सीआयएसएफच्या महिला पोलीस कर्मचारी आणि प्रवाशांनी डोक्यावर हात मारून घेतला.
नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार उदयोग विहार, गुडगाव) असे विमानतळाला वेठीस धरणाऱ्या आजीबाईंचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात सीआयएसएफच्या महिला पोलीस शिपाई दीपाली झावरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८२, ५०५ नुसार गुन्हा केला आहे. असे खोटे बोलणे हे कायद्यानुसार गुन्हा असून त्यासाठी आर्थिक दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. यामुळे आजीबाईंनी केलेली गंमत त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे.
नीता कृपलानी आपल्या कुटुंबियांसमवेत दिल्लीवरून पुणे शहरात साधू वासवानी यांच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रम झाल्यावर गुरूवारी (दि. ३) परत दिल्लीला जात असताना विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली. ती सुरू असताना ‘‘माझ्या चारही बाजूंना बॉम्ब आहेत’’ असे त्यांनी सांगितले. कृपलानी ही गोष्ट गमतीने बोलल्या. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची कसून तपासणी करण्यात आली. भारतीय दंड विधानानुसार हा गुन्हा असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दीपाली झावरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांची विमानतळावर नेमणूक आहे. गुरुवारी दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत त्यांची कामाची वेळ होती. कामावर असताना त्यांच्यासोबत महिला पोलीस उपनिरीक्षक वंदना मोरे आणि इतर सहकारी होत्या. त्या सर्वजणी महिला विमान प्रवाशांची तपासणी करण्याचे काम करत होत्या. दुपारी २ वाजताच्या सुमारास महिलांची तपासणी करत असताना नीता यांनी फिर्यादीस सांगितले की, ‘‘मेरे चारों तरफ बम लगा है,’’ त्यावर फिर्यादी यांनी त्या महिलेस बूथमधून महिला पोलीस उपनिरीक्षक वंदना मोरे यांच्याकडे नेले आणि सगळा प्रकार सांगितला.
त्यावर उपनिरीक्षक मोरे यांनी आरोपी महिलेची चौकशी केली. तिचे नाव आणि पत्ता विचारला. आरोपी महिला इंडिगो विमानाने पुणे ते दिल्ली असा प्रवास करणार असल्याचे चौकशीतून कळले. नीता यांच्यासोबत असलेल्या महिला मीना जगतियानी आणि पुरुष किशोर जगतियानी यांचीदेखील कसून तपासणी करण्यात आली. मात्र तिघांपैकी कुणाकडेही बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ आढळून आले नाही. त्यावरुन आरोपी नीता यांनी “मेरे चारों तरफ बम लगा है,’’ अशी खोटी अफवा पसरवून फिर्यादी आणि त्यांचे साथीदार यांना खोटी माहिती दिल्याचे समोर आले. खोटी माहिती देऊन अफवा पसरवल्याप्रकरणी नीता यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले की, ‘‘आरोपी महिलेचा गुन्हेगारी पूर्वइतिहास आम्ही तपासला. त्यांच्यावर कोणताच गुन्हा नसल्याचे आढळून आले. त्या गंमतीने बोलल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी आम्ही अधिक तपास करीत आहोत.’’