महापालिकेतील हिरकणी अडगळीतच

महापालिकेतील महिला कर्मचारी आणि कामानिमित्त पालिका इमारतीत येणाऱ्या मातांना आपल्या चिमुकल्यांना दूध पाजता यावे यासाठी महापालिकेत सहा वर्षांपूर्वी गाजावाजा करीत हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. वर्षभरापूर्वी या कक्षाचे स्थलांतर महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आले. अजूनही हा कक्ष कागदोपत्रीच असून, येथे महापालिकेच्या अन्य विभागाचे कामकाज सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 01:30 pm
महापालिकेतील हिरकणी अडगळीतच

महापालिकेतील हिरकणी अडगळीतच

कागदोपत्री स्थलांतर, कक्षात चालते अन्य विभागाचे कामकाज; मातांचे हाल होत असल्याने महिला आयोगाचे महापालिकेला पत्र

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

महापालिकेतील महिला कर्मचारी आणि कामानिमित्त पालिका इमारतीत येणाऱ्या मातांना आपल्या चिमुकल्यांना दूध पाजता यावे यासाठी महापालिकेत सहा वर्षांपूर्वी गाजावाजा करीत हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. वर्षभरापूर्वी या कक्षाचे स्थलांतर महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आले. अजूनही हा कक्ष कागदोपत्रीच असून, येथे महापालिकेच्या अन्य विभागाचे कामकाज सुरू आहे. याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, तातडीने यावर कार्यवाही करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.

महापालिकेतील मुख्य इमारतीतील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या महिला नागरीकांसाठी २०१६ साली हिरकणी कक्ष उभारला होता. त्यावेळच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने महिलांना सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा कक्ष उभारला होता. याठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था होती. तसेच, एखाद्या महिलेला अस्वस्थ वाटल्यास थोडा वेळ विश्रांती घेण्याची सोय होती. मात्र गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुमारास तळमजल्यावर असलेल्या हिरकणी कक्षाचे स्थलांतर करण्यात आले. त्यांना महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाच्या शेजारील खोलीत जागा देण्याचे निश्चित झाले. तर, पूर्वीच्या हिरकणी कक्षाच्या ठिकाणी दिव्यांग कक्षाची निर्मिती करण्यात आली. दिव्यांगांना तळमजल्यावर कक्ष आवश्यक होता. त्यामुळे हिरकणी कक्षाच्या स्थलांतरास कोणाचाच विरोध नव्हता. मात्र, त्यानंतर महापालिकेने ठरवल्यानुसार हिरकणी कक्षाची उभारणीच झाली नाही.

याबाबत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिकेकडे हिरकणी कक्ष सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यांच्याकडून सकारात्मक पावले उचलली न गेल्याने वेलणकर यांनी १८ फेब्रुवारीला राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली. महिला आयोगाने त्याची तातडीने दखल घेत मंगळवारी (दि. २१) महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्यात हिरकणी कक्ष तातडीने सुरू करुन महिलांची गैरसोय दूर करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती आयोगाच्या कार्यालयास पाठवावी असे पत्र महिला आयोगाच्या उपसचिव दीपा ठाकूर यांनी दिले आहे.

याबाबत माहिती देताना सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, महिलांसाठी २०१६ साली गाजावाजा करुन हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा कक्ष बंद आहे. तळमजल्यावरील या कक्षाच्या जागी दिव्यांग कक्ष उभारला असून, हिरकणी कक्ष तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आला आहे. मात्र, कक्ष स्थलांतरीत केलेल्या जागेवर अन्य विभागाचे कामकाज सुरू आहे. तिथे हिरकणी कक्षाचा साधा बोर्डही लावण्यात आलेला नाही. हिरकणी कक्षाच्या जागेत मालमत्ता विभागाच्या फायली दिसून येत आहेत. अन्य विभागाचे दोन कर्मचारी तिथे काम करताना दिसतात.

हिरकणी कक्षाची नवीन जागा निश्चित आहे. केवळ इच्छाशक्ती नसल्याने हा कक्ष सुरू होत नाही. हिवाळी अधिवेशनात एका महिला आमदाराने नुकताच बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर त्या बाळाला घेऊन नागपूरच्या विधानभवनात आल्या होत्या. त्यावेळी अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रशासनाने एका दिवसात तिथे हिरकणी कक्ष स्थापन केला. याची आठवणही महापालिकेला तेव्हा करुन दिली. त्यानंतरही हिरकणी कक्ष सुरू झाला नाही. अखेर कंटाळून मला महिला आयोगाकडे धाव घ्यावी लागल्याचे वेलणकर म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story