ढासळणारा तोरणा नव्याने उभा राहतोय...
विजय चव्हाण
स्वराज्याचे तोरण बांधलेल्या तोरणा किल्ल्यावर राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून आता डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या राज्य पुरातत्त्व विभागाने तोरणा गडावरील ढासळलेल्या बुरुजांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली असून, पथ दुरुस्तीसुद्धा करण्यात येत आहे. त्यासोबतच तोरणा गडावरील बिनी दरवाजा, मेंगाई मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू आहे.
हे काम पावसाळ्याच्या आतच करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक किल्ल्याला अवकळा प्राप्त झाली होती.
शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरून नुकतेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील किल्ल्यांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार आता राज्यातील विकास न झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचे शासनाचे नियोजन दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील अनेक दुर्लक्षित किल्ल्यांचा विकास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तोरणाविषयी...
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करीत असताना १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून ‘प्रचंडगड’ असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी
राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला आणि याचे नाव ‘प्रचंडगड’ ठेवले. त्यांनी या गडावर बरेच बांधकाम केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.