इथली यत्ता, दारूचा गुत्ता
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
शाळेच्या आवारातच दिवसाढवळ्या तळीराम पार्ट्या झोडत असून ते पाहून विद्यार्थी कशाचे शिक्षण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तळीरामांबरोबर गर्दुलेही आवाराचा बिनधास्त वापर करत असतात. दोन दिवसांपूर्वी दारुडे आणि गांजा पिणाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन-तीनजण जखमी झाले आणि आवारात रक्त सांडले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याची तक्रार पोलिसांत करणाऱ्या शिक्षिकेला तुम्ही प्रथम घरात लक्ष द्या आणि नंतर समाजकार्य करा असा सल्ला खडकी पोलिसांनी दिल्याचा दावा या शिक्षिकेने केला आहे..
बोपोडी येथे पुणे महापालिकेची सर्वपल्ली राधाकृष्णन् प्रशाला असून या शाळेच्या आवारात महापालिकेची उर्दू माध्यमाची शाळा, दिवंगत अनंतराव पवार मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल अशा दोन शाळा आहेत. म्हणजे एका ठिकाणी ती शाळा असून त्याचबरोबर येथे महिला बाल कल्याण विभागाची अंगणवाडी देखील भरते. साहजिकच येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, तीन शाळा आणि एक अंगणवाडी असूनही तेथे एकाच शाळेला सुरक्षा रक्षक आहे. यामुळे त्याला संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही.
सोमवार ते शुक्रवार शाळा सुटल्यानंतर सायंकाळी साडेचार नंतर या ठिकाणी गर्दुले आणि मद्य प्राशनासाठी दारुड्यांची गर्दी होते.
शनिवारी दुपारची शाळा असताना दारू पिणारे आणि गर्दुले आधीच येऊन नको ते उद्योग करत असतात. ते पाहून विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दोन दिवसांपूर्वी दारू आणि गांजा पिण्यावरून येथे हाणामारी झाल्याचे शिक्षक सांगतात. हाणामारीमध्ये दोन ते तीन मुले जखमी झाली. तसेच शाळेच्या आवारात रक्त पसरल्याने सोमवारी प्रथम शिक्षकांना हा परिसर स्वच्छ करावा लागला. बोपोडी व्यतिरिक्त अन्य भागातील मुलेही शाळेत येत असल्याने स्थानिक आणि बाहेरील मुलांमध्ये वादाचे प्रसंग वाढत आहेत. शाळा महापालिकेच्या आवारात असल्याने शिक्षण विभागाच्या प्रशासनाकडून याबाबत संबंधितांवर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु, महापालिका प्रशासन येथे सुरक्षा रक्षक वाढविणे तसेच मद्यपींवरील कारवाईसाठी पोलिसांकडे पाठपुरावा करताना दिसत नाही.
या चारही शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही गोरगरिबांची असून, त्यांना किमान येथे आल्यावर तरी सुरक्षित आणि सुस्थितीत शिक्षण मिळावे अशी माफक अपेक्षा पालकांची असते. आम्ही मुलांना जास्तीत जास्त चांगल्या शिक्षणाबरोबरीनेच समाजातील अपप्रवृत्तींबाबत विद्यार्थ्यांना शिकवत असतो. परंतु, शाळेच्या परिसरातच अपप्रवृत्तींचा सुळसुळाट झाल्याने आम्ही त्रस्त आहोत, अशी प्रतिक्रिया येथील एका शाळेच्या शिक्षकाने ‘सीविक मिरर’शी बोलताना दिली.
संविधानाचा आशय असलेली कोनशिला शाळेच्या परिसरात बसविण्यात आली असून, दारू पिणारे याच कट्ट्यावर बसून दारू पित असतात. शाळेचे सुरक्षा रक्षक अथवा शिक्षकांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यास अश्लील शिवीगाळ करणे, धमकाविणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या मुलांना आता हटकणे शिक्षकांनी सोडून दिले आहे.
यापूर्वी दारू आणि गांजा पिणाऱ्यांबाबत तक्रार करणाऱ्या शिक्षिका जयश्री गायकवाड यांच्यावर टवाळखोरांनी हल्ला देखील केला होता. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. शाळेच्या पवित्र आवारात अशा घटना घडू नये यासाठी सर्व ते प्रयत्न करतच राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. परिसरातील काही राजकीय व्यक्तींची मदत घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न काही शिक्षकांनी केला होता. परंतु, या लोकांकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या तीन शाळांमध्ये आणि अंगणवाडीत येणारे विद्यार्थी एक ते दहा वयोगटातील कोवळ्या मनाचे आहे. त्यांच्यासमोर तळीरामांचे वर्ग भरणार असतील तर त्यांनी कोणाचे अनुकरण करायचे, असा प्रश्न पालक विचारत आहेत. या मुलांच्या समोर अनुचित प्रकार करणाऱ्या गर्दुले आणि दारू पिणाऱ्यांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक असल्याचेही काही पालकांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.