रॅश ड्रायव्हिंग ठरवणार चालकाचे ‘कॅरेक्टर’
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
मित्र-मैत्रिणींना घेऊन ट्रिपल सीट वाहन दामटणे, एकेरी वाहतुकीतून वाहन दामटणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालवणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे अशा बेशिस्त वाहतुकीच्या चुका आता युवकांना चांगल्याच महागात पडणार आहेत. अशा ४७० वाहनचालकांचा वाहन परवाना वाहतूक पोलिसांनी निलंबित केला आहे. यात महाविद्यालयीन युवकांचे प्रमाण अधिक आहे. महाविद्यालयातील युवकांनी अतिउत्साहात केलेल्या चुका त्यांच्या चारित्र्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. कारण परदेशात जाण्यापूर्वी अनिवार्य कॅरेक्टर सर्टिफिकेटवर (चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र) वाहन परवाना निलंबित केल्याचा उल्लेख होणार आहे. त्यामुळे परदेशात वाहन परवाना मिळवताना अशा व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वेगाने वाहन दामटणे, एकेरी वाहतूक असताना विरुद्ध दिशेने वाहन नेणे, मित्र आणि मैत्रिणींबरोबर ट्रिपलसीट सुसाट जाणे, बुलेटसारख्या वाहनाचा सायलेन्सर बदलून तो कर्कश करण्याचे प्रमाण शहरात वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची शिस्त मोडत असून अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. अशा पद्धतीच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे वाहनचालक स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालताना दिसतात. त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्या, मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या सर्वच बेशिस्त वाहनचालकांच्या विरोधात पुणे वाहतूक पोलिसांनी नुकतीच एक मोहीम राबवली. त्यात सर्व वयोगटातील पुरुष, महिला, युवक आणि युवती बेशिस्तपणे वाहन चालवत असल्याचे आढळले.
बेदरकारपणे वाहन चालवण्यात युवकांचा भरणा अधिक असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. ट्रिपल सीट जाणे, वाहनाचा सायलेन्सर बदलून कर्कश आवाज काढत जाणाऱ्यांमध्येही युवकांचे प्रमाण लक्षणीय आहे. एकूणच रॅश ड्रायव्हिंग करण्यात युवक आघाडीवर आहेत. पोलिसांनी ठिक-ठिकाणी अशी मोहीम राबवत कारवाई केली. काही ठिकाणी पोलिसांना पाहून एकेरी वाहतुकीचे नियम तोडून येणारे वाहन धोकादायक पद्धतीने यू-टर्न करून माघारी जात असल्याचे दिसून आले. अशांचे व्हीडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. या वाहनचालकांवरदेखील वाहतूक पोलिसांनी कारवाईची तयारी केली असल्याचे समजते.
वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर म्हणाले, रॅश ड्रायव्हिंग करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. ट्रिपल सीट वाहन दामटल्यानेही जीवघेणे अपघात झाले आहेत. एकेरी वाहतूक असताना विरुद्ध दिशेने जोराने वाहन दामटणे म्हणजे रस्त्यावरून मिसाईल नेण्यासारखेच आहे. त्यामुळे वाहनचालकाचाच नव्हे तर त्याच्यामुळे इतरांच्याही जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मद्य प्राशन करून वाहन चालवल्यामुळेही अपघात घडू शकतात. बुलेट वाहनाचे सायलेन्सर बदलून कर्कश केले जाते. असे वाहन वेगाने नेल्याशिवाय त्यातून मोठा आवाज येत नाही. त्यामुळे अशा बुलेटचालकांकडून अपघाताची शक्यता वाढते. या कारणांमुळे रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली असून, ४७० वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.