वाहिनी उशालाच... पाणी नाही कशालाच
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
चऱ्होली-मोशी भागातील सोसायट्यांना पिण्याचे पुरेसे पाणी न मिळण्याची समस्या कायम असून, पुढील ८ दिवसांत आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला जाणारे पाणी घेऊ दिले जाणार नाही, असा इशारा या सोसायटीधारकांनी दिला आहे.
चिखली येथील पाटीलनगर या ठिकाणची विस्टेरिया सोसायटी आणि आजूबाजूच्या इतर सोसायट्यांनाअनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यापूर्वी वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख आणि एकंदरित शहरातील पाण्यासाठी पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने अनेकदा आवाज उठविला आहे. त्यानंतर आता चऱ्होली-मोशी-चिखली हाउसिंग सोसायटी फेडरेशनने थेट पाणी बंदचा नारा दिला आहे. पाणी आंदोलन करून, निष्क्रिय पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात जाऊन सामूहिक गोट्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येईल, असा इशारादेखील सोसायटी फेडरेशनने घेतला आहे.
फेडरेशनने महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे. चिखली येथील पाटीलनगरमधील बगवस्ती या ठिकाणच्या विस्टेरिया सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायट्यांना मागील एक वर्षापासून अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. ‘‘याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला असता याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. मागील दहा दिवसापासून तर या भागात अतिशय कमी पाणीपुरवठा होत आहे. ५०० सदनिका असलेल्या सोसायटीस फक्त ४ ते ५ हजार लिटर पाणी तेदेखील दिवसाआड मिळत आहे. या भागात पाणी सोडण्यासाठी ठेवलेल्या ठेकेदाराकडून कोणतेही नियोजन न करता पाणी सोडले जाते. त्याचबरोबर ज्यांच्याकडून ‘चिरीमिरी’ मिळेल त्यांनाच पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो, अशी शंका घेण्यास वाव आहे,’’ असा थेट आरोप फेडरेशनने केला आहे. चिखलीमधील इतर भागांत मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. फक्त बगवस्तीमधील ५०० हून अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांना खूप कमी प्रमाणत पाणी सोडले जात असल्याचा दावा फेडरेशनने केला आहे.
मागील चार वर्षांत या सोसायट्यांनी विकत पाणी घेण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याची सर्व बिले आपणला सादर केली जातील, असे सांगण्यात आले आहे. जर पाण्यासाठी २५ कोटी रुपये लागत असतील तर आयुक्तसाहेब आपल्या महापालिकेने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या नावाने अमच्यावर लादलेला टॅक्स का भरावा, हेच कळत नाही? आपली महापालिका पाणीपुरवठा करू शकत नसेल तर तुम्ही टॅक्सदेखील घेऊ नका,’’ अशा शब्दांत या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आयुक्तांना सुनावले आहे.
या सोसायटीच्या अगदी समोरच आता नवीनच कार्यान्वित झालेला चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. तरीदेखील या भागातील सोसायट्यांना रोज १५ टँकर पाणी विकत घ्यावे लागते. हे म्हणजे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही परिस्थिती बघता पुढील ८ दिवसांत पाण्याची समस्या न सुटल्यास या भागातील सर्व सोसायटी सदस्यांमार्फत आंदोलन करून चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी जाऊ दिले जाणार नाही, असा पावित्रा सोसायटीधारकांनी घेतला आहे.
आमचा पाणीप्रश्न जटील बनला आहे. पुढील ८ दिवसांत प्रश्न सुटला नाही तर या भागात असणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहराला पाणी जाऊ दिले जाणार नाही. तसेच अकार्यक्षम प्रशासनाविरुद्ध रस्ता रोको करून चिखली-देहूरोड अडवून धरू. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्रीकांत सवने आणि कार्यकारी अभियंता टकले तसेच अन्य पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना गोट्या वाटपाचा कार्यक्रम घेण्याचे आम्ही ठरविले आहे.
- संजीवन सांगळे,
अध्यक्ष, चऱ्होली-मोशी-चिखली हाउसिंग सोसायटी फेडरेशन
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.