‘आरसी’वरून हटेना कर्जाचा बोजा

वाहन खरेदी करताना अनेकजण बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात. तशी नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नोंदणी प्रमाणपत्रावर (आरसी) केली जाते. कर्जाचे हप्ते पूर्ण झाल्यानंतर बॅंकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्यानंतर ती नोंद हटवली जाते. पण मागील काही दिवसांपासून आरसीवरून ही नोंदच हटत नसल्याने वाहन मालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 10 Mar 2023
  • 01:07 pm
‘आरसी’वरून हटेना कर्जाचा बोजा

‘आरसी’वरून हटेना कर्जाचा बोजा

कर्जाचे सगळे हप्ते फेडूनही मिळत नाही ना हरकत प्रमाणपत्र; ‘एनआयसी’च्या तांत्रिक चुकीमुळे वाहनमालक अडचणीत

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

वाहन खरेदी करताना अनेकजण बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात. तशी नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नोंदणी प्रमाणपत्रावर (आरसी) केली जाते. कर्जाचे हप्ते पूर्ण झाल्यानंतर बॅंकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्यानंतर ती नोंद हटवली जाते. पण मागील काही दिवसांपासून आरसीवरून ही नोंदच हटत नसल्याने वाहन मालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने ही नोंद हटवणे आणि वाहन विक्री करणे ही कामे एकत्रित करताना तसेच नव्याने कर्ज घेतल्यानंतरही जुन्याच बॅंकेचे नाव आरसीवर छापले जात आहे. त्यामुळे अनेकांची वाहनविषयक कामे रखडली आहेत.

आरसीवर नोंद म्हणजे संबंधित कारवर कर्जाचा बोजा चढवलेला असणे. ही बॅंकेकडे हप्ते संपेपर्यंत तारण असते. हप्ते संपल्यानंतर बॅंकेकडून एनओसी दिली जाते. त्याआधारे आरटीओकडे अर्ज केल्यानंतर बँकेचा बोजा कमी करून म्हणजे बँकेचे आरसीवरून नाव हटवून नव्याने आरसी दिले जाते. आरटीओ कार्यालयाकडील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरकडून (एनआयसी) केली जाते. एनआयसीच्या तांत्रिक घोळामुळे असे प्रकार राज्यभर घडत असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून हजारो वाहन मालकांना या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पुणे आरटीओ कार्यालयातही याबाबत दररोज तक्रारी येत आहेत. याविषयी  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, मागील काही दिवसांपासून एनआयसीच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने ही अडचण येत आहे. हा प्रकार काही दिवसांत दुसऱ्यांदा घडला आहे. त्यामुळे सध्या प्रामुख्याने बँक कर्ज उतरवणे व मालकी हस्तांतरण तसेच या दोन गोष्टींसह नव्याने कर्जाचा बोजा चढवताना पूर्वीच्या बॅंकेचे नाव आरसीवर छापून येत आहे. याबाबत एनआयसीशी संपर्क साधून तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हा दोष दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राज्यभरातच ही अडचण येत असल्याने परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व आरटीओला पत्र पाठवले आहे. त्याचप्रमाणे एनआयसीकडूनही प्रत्येक आरटीओनिहाय वाहनांची माहिती परिवहन विभागाला कळवली आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व आरटीओकडून संबंधित वाहनांची माहिती मागवली आहे. आरसीवरील दुरुस्त्या या कार्यालयाकडून केल्या जाणार आहेत. त्यानंतरच नव्याने आरसी स्मार्ट कार्डची छपाई केली जाणार आहे. या प्रकारामुळे वाहतूकदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी बापू भावे यांनी सांगितले की, सध्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. आधीच आरसी मिळण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यातच अशा तांत्रिक दोषामुळे पुढची सर्व कामे रखडत आहेत. दुरुस्तीसाठी पुन्हा दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे वाहन विक्री किंवा वाहनविषयक इतर कामेही होत नाहीत. हजारो वाहनमालकांची हीच अवस्था झाली आहे.  ही पूर्णपणे एनआयसीची चूक असून सातत्याने असे प्रकार घडतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तांत्रिक चुका झाल्यानंतर त्या दुरुस्त करण्याचे अधिकार आरटीओ कार्यालय स्तरावर सहायक आरटीओकडे देणे गरजेचे आहे. एनआयसीकडून चुका दुरुस्त होऊन येण्यासाठी बराच कालावधी लागतो. यामध्ये वाहन मालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी भावे यांनी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story