ब्रेक टेस्ट यंत्रणाच फेल
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
रिक्षाची फिटनेस चाचणी घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोठा गाजावाजा करीत उभारलेली रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणाच अनफिट ठरली आहे. उभारल्यानंतर अवघ्या दीड महिन्यांतच यंत्रणेने मान टाकली. विशेष म्हणजे गेल्या नऊ महिन्यांत फिटनेस चाचणी घेणाऱ्या यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आरटीओला अपयश आले आहे. दीर्घकाळ देखभाल दुरुस्तीअभावी टेस्टिंग यंत्र असल्याने संपूर्ण यंत्रणाच गुंडळावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
पूर्वी दिवे घाटात रिक्षांची फिटनेस टेस्ट होत असे. जास्त अंतर असल्याने आळंदी रस्त्यावरील फुले नगर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या जागेत अत्याधुनिक रोलर ब्रेक टेस्टर यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी पुण्याचे तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून २०१७-१८ साली ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. जवळपास दोन ते तीन गुंठे जागेत शेड उभारले असून, त्यात वाहनांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. याद्वारे फिटनेस टेस्टचा अहवाल तयार होणार होता.
त्याची प्रिंट काढण्याची सुविधा देखील तयार झाली होती. या कामासाठी निधी अपुरा पडत असल्याने खासदार गिरीश बापट यांनीही आपल्या फंडातून पैसे उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात येते. ही यंत्रणा रिक्षा आणि हलक्या वाहनांसाठी उभारल्याचे कामाची माहिती देणाऱ्या कोनशिलेवरून दिसते. मात्र येथे केवळ रिक्षांचीच ब्रेक टेस्ट झाली. हे काम साज टेस्ट प्लांट कंपनीने केले आहे. या कामास जून २०१८ मध्ये सुरुवात झाली. आरटीओ कार्यालयाला कामाचे हस्तांतर १९ मे २०२२ रोजी करण्यात आले. त्यानंतर जून २०२२ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले.
उद्घाटनानंतर अवघ्या एक ते दीड महिन्यातच ही यंत्रणा कोलमडली. त्यानंतर संपूर्ण यंत्रणाच बंद ठेवली आहे. विशेष म्हणजे गेल्या नऊ महिन्यांत या यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आरटीओला अपयश आले आहे.
ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट कमिटी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष एकनाथ ढोले म्हणाले, रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणा कूचकामी आहे. त्याचा जनतेला काही फायदा नसल्याचे सिद्ध झाले आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी राज्यात विविध ठिकाणी अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. शासनाने चुकीच्या ठिकाणी निधी दिला आहे. या कामासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्ची पडले आहेत. उद्घाटनानंतर महिना-दीड महिना देखील टेस्टिंग यंत्रणा चालू शकली नाही.
प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे म्हणाले, शहरात तब्बल ९० हजार रिक्षा आहेत. पूर्वी त्यांची फिटनेस टेस्ट दिवे घाटात होत होती. हे अंतर लांब असल्याने आळंदी रस्त्यावर ट्रॅक आणि रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणा उभारण्यात आली. या ब्रेक टेस्टिंग यंत्रणेद्वारे दिवसाला दीडशे ते दोनशे रिक्षांची चाचणी केली जात होती. काही तांत्रिक कारणांमुळे यंत्रणा बंद पडली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.