दुचाकीस्वारांनी कोयत्याचा धाक दाखवत ४७ लाख लुटले

मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. दर दोन दिवसाला वेगळे प्रकरण पुढे येत आहे. कोयता दाखवून दहशत माजवून नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. तसाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. नाना पेठेत भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून तरुणांनी एका व्यापाऱ्याकडील ४७ लाख रुपयांची रक्कम लांबवली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 24 Mar 2023
  • 08:15 am
दुचाकीस्वारांनी कोयत्याचा धाक दाखवत ४७ लाख लुटले

दुचाकीस्वारांनी कोयत्याचा धाक दाखवत ४७ लाख लुटले

बँकेत पैसे जमा करणाऱ्या तंबाखूच्या व्यापाऱ्याची पिशवी लांबवली; कोयता गँगची दहशत कायम

#नाना पेठ

मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. दर दोन दिवसाला वेगळे प्रकरण पुढे येत आहे. कोयता दाखवून दहशत माजवून नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. तसाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. नाना पेठेत भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून तरुणांनी एका व्यापाऱ्याकडील ४७ लाख रुपयांची रक्कम लांबवली आहे.

नाना पेठेतील आझाद आळी येथे हा प्रकार घडला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी व्यापाऱ्याला कोयता दाखवून पैशांनी भरलेली पिशवी पळवली. ही माहिती मिळताच समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकीवर जात असताना दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन या व्यापाऱ्याला अडवले. गाडीवरून उतरून त्या दोन तरुणांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला आणि त्याच्याकडील पैशाने भरलेली पिशवी घेऊन ते दोघेही पसार झाले. व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल ४७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात आतापर्यंत या गॅंगने पुण्यातील अनेक परिसरात धुमाकूळ घातला आहे. अनेकांवर जीवघेणे हल्लेदेखील केले आहेत. पोलिसांकडून या कोयता गँगच्या आरोपींची धिंडदेखील काढली होती. मात्र त्यानंतरही या आरोपींना पोलिसांचा धाक वाटत  नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच या कोयता गँगच्या म्होरक्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. सचिन माने असे या म्होरक्याचे नाव होते.

पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा टोळक्यांना ठोकून काढणार,असे सांगितले आहे. त्यामुळे आता तरी अशा गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा वचक बसतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story