क्लच बिघडलेल्या पीएमपी बसचा अपघात चालकाच्या कौशल्यामुळे टळला
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर खिळखिळी बस माघारी बोलावण्याची वेळ पुणे परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आली होती. ही घटना ताजी असतानाच अशाच एका बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. प्रवाशांनी भरलेल्या गाडीचा क्लच नादुरुस्त झाला होता. मात्र, बसचालकाने कौशल्याने बस हाताळत बस डेपोपर्यंत सुखरूप नेल्याने अपघात टळला.
कोथरूडमधील नागरिकांनी अत्यंत खिळखिळी झालेल्या बसचा व्हीडीओ काढून पुणे परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना दाखवला होता. त्या बसची अवस्था पाहून बकोरिया यांनीही संबंधित बस माघारी बोलावण्याचा आदेश दिला होता. यासंदर्भात ‘सीविक मिरर’ने
२२ एप्रिलच्या अंकात ‘खिळखिळी बस आत्ता बस्स’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याला काही दिवस उलटत नाही तोच आणखी एका अनफिट बसची माहिती समोर आली आहे. डीएसके विश्व येथे राहणारे हनकुमार सुहास शुक्रवारी (दि. २८) सिंहगड रस्ता ते स्वारगेट या बसने प्रवास करत होते. त्यावेळी बसचा क्लच काम करेनासा झाला. बसमध्ये बरेच प्रवासी होते. चालकाने कौशल्याने बस हाताळत स्वारगेट डेपो गाठला. यावरून पीएमपी प्रशासन व्यवस्थित तपासणी न करता गाड्या रस्त्यावर सोडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ‘‘अशी बस रस्त्यावर सोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी,’’ अशी मागणी त्यांनी पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
बसचालक दादासाहेब तिखे म्हणाले, ‘‘सिंहगड ते स्वारगेट या मार्गावर बस चालवत होतो. दुपारी एकच्या सुमारास अभिरुची मॉलच्या पुढे गाडी गेल्यानंतर क्लच काम करीत नसल्याचे लक्षात आले. मात्र बसचा वेग कमी करून वाहन चालवत नेले. प्रत्येक सिग्नलला वाहन बंद करून पुन्हा चालू करून स्वारगेट डेपोपर्यंत व्यवस्थित गाडी नेली. किमान दहा ते बारा वेळा गाडी चालू-बंद करावी लागली. बसमध्ये साधारण ३५ प्रवासी होते. त्यांची अडचण होऊ नये, याची दक्षता घेऊन वाहन अत्यंत धीम्या गतीने चालवले. तसेच, समोरच्या वाहनांशी सुरक्षित अंतर ठेवले. ब्रेकडाऊन केली असती तर प्रवाशांची गैरसोय झाली असती. त्यामुळे ब्रेकडाऊन न घेता वाहन स्वारगेटपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला. सिंहगड ते स्वारगेट अंतर कापण्यासाठी सरासरी १ तास २० मिनिटे जातात. नेहमीपेक्षा २०-२५ मिनिटे विलंबाने गाडी स्वारगेट स्थानकात पोहचली.’’
सामाजिक कार्यकर्ते सेंथिल अय्यर म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी कोथरूडच्या नागरिकांसोबत आम्ही एका बसचा व्हीडीओ पीएमपी अध्यक्षांना दाखवला होता. एमएच-१२ एफझेड ८१७९ ही बस अत्यंत खिळखिळी झाली होती. बसच्या छताचा आणि फ्लोअरचा पत्रा उचकटलेला होता. तर, एक दरवाजा चक्क दोरीने बांधलेला होता. गिअरबॉक्स जवळ पत्रा नसल्याने भगदाड दिसत होते. चालक बसत असलेले सीटही खिळखिळे झाले आहे. ते हलू नये, यासाठी सीटचे लोखंडी अँगल आणि सीटच्या मध्ये चक्क झाडाच्या फांदीची काडी लावण्यात आली होती. ही अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी बस माघारी बोलावली होती. आम्ही शंभर बसची तपासणी केली आहे. त्यात बहुतांश बसमधील गिअर, क्लच व्यवस्थित काम करीत नव्हता. तसेच, काही बसचे हँडब्रेकही निकामी झाले होते.’’
‘‘तपासणी न करता बस रस्त्यावर आणणे धोक्याचे आहे. केवळ प्रवाशांच्याच नव्हे तर रस्त्यावरील इतर नागरिकांचा जीवही धोक्यात घालण्यासारखे आहे. असे प्रकार गांभीर्याने घेऊन पीएमपीने रस्त्यावर वाहन सोडण्यापूर्वी योग्य त्या प्रक्रियेचे पालन केले पाहिजे,’’ अशी मागणी अय्यर यांनी केली.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना पीएमपीचे मुख्य अभियंता रमेश चव्हाण म्हणाले, ‘‘स्वारगेट बस डेपोतील सीएनजी बसचा क्लच फेल झाला होता. प्रवाशांना वाट पाहावी लागेल, त्यामुळे चालकाने ब्रेकडाऊन घेतले नाही. त्याने वाहन अत्यंत सावकाश चालवत सुरक्षितपणे स्वारगेट डेपोत आणले.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.