‘ती’ पायरी गंगाजल शिंपडून केली शुद्ध
विजय चव्हाण
vijay.chavan@civicmirror.in
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हीडीओ सोमवारी (१७ जुलै) समोर आल्यापासून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये किरीट सोमय्या यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत सोमय्या ज्या पायरीवर पडले होते ती जागा काँग्रेस पक्षाच्या नेत्या संगीता तिवारी यांनी गंगाजल शिंपडून शुद्ध केली. तसेच यावेळी किरीट सोमय्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
शिवाजीनगर येथील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागील वर्षी तक्रार करण्यास आले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी महापालिकेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतेवेळी किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये किरीट सोमय्या हे पायरीवर पडले आणि त्यामध्ये ते जखमी देखील झाले होते. त्यावरून राज्यभरात भाजप विरुद्ध ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहण्यास मिळाले. हे राजकारण अद्यापही सुरूच आहे.
दरम्यान भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हीडीओ समोर आला. त्यावरून राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात ठाकरे गटाच्या महिला सेनेमार्फत किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन ठाकरे गटाच्या महिला सेनेच्या शहर संघटिका सविता मते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी संगीता तिवारी म्हणाल्या की, पुणे महापालिकेच्या सभागृहात महात्मा फुले यांच्यापासून अनेक नेत्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. या वास्तूमध्ये किरीट सोमय्या हे काही महिन्यांपूर्वी
आले होते. किरीट सोमय्या यांचा काल व्हीडीओ समोर आल्याने, महापालिकेची वास्तू अपवित्र झाली आहे. त्यामुळे सोमय्या ज्या ठिकाणी आले आणि पडले ती जागा आम्ही गंगाजल शिंपडून शुद्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, भाजपमधील एकही नेता किरीट सोमय्या यांच्या व्हीडीओबाबत अद्याप पर्यंत बोलत नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या महिलांच्या अन्याय-अत्याचाराच्या प्रश्नावर भूमिका मांडतात. मग किरीट सोमय्या यांच्या ‘त्या’ व्हीडीओ प्रकरणी या दोन महिला नेत्या गप्पा का, असा सवाल करत, ‘आता शेळी का झाली?’ असा टोलादेखील यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांना
लगावला. त्या पुढे म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांनी भाजपमधील अनेक महिलांच्या बाबतीत घाणेरडे शब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.