ठाण्याने घेतला धडा, पुणे मागेच

पुण्यासह मुंबईत हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया (एचपी-न्यूमोनायटिस) वाढत असल्याचे सांगत ठाणे महापालिकेने दक्षता मोहीम हाती घेतली आहे. पारव्यांना (कबुतरे) खाद्यान्न टाकू नका, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, पुणे महापालिकेकडे एचपी न्यूमोनिया अशी स्वतंत्र नोंदच गेल्या वर्षभरात झालेली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 5 Mar 2023
  • 01:47 am
ठाण्याने घेतला धडा, पुणे मागेच

ठाण्याने घेतला धडा, पुणे मागेच

एचपी न्यूमोनियाबाबत पुण्यात स्वतंत्र नोंदच नाही, गरज पडल्यास जनजागृती करणार

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

पुण्यासह मुंबईत हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया (एचपी-न्यूमोनायटिस) वाढत असल्याचे सांगत ठाणे महापालिकेने दक्षता मोहीम हाती घेतली आहे. पारव्यांना (कबुतरे) खाद्यान्न टाकू नका, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, पुणे महापालिकेकडे एचपी न्यूमोनिया अशी स्वतंत्र नोंदच गेल्या वर्षभरात झालेली नाही. केवळ संसर्गजन्य आजारांच्या नोंदीत जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत १ हजार ५०८ न्यूमोनियाच्या रुग्णांची नोंद झाल्याची आकडेवारी महापालिकेकडून उपलब्ध झाली. ठाणे महापालिकेने राबवलेल्या मोहिमेची माहिती अधिकाऱ्यांना दिल्यावर, अशीच जागृती मोहीम आपणही पुन्हा सुरू करणार असल्याचे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरामध्ये बाबा भिडे पुलाजवळील नदीपात्र, काँग्रेसभवन समोरील घाट, कामगार पुतळा, रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौक अशी पारव्यांना धान्य टाकण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्याच शिवाय शहर आणि उपनगरातही पारव्यांना खाद्यान्न टाकणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. पर्वतीजवळील पाणी शुद्धीकरण केंद्राजवळही काही नागरिक पक्ष्यांना धान्य टाकतात. त्यामुळे येथील विद्युत यंत्रणेजवळ पक्ष्यांचा वावर वाढून अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याशिवाय अशा पक्ष्यांच्या विष्ठेतून जीवजंतू पसरत असल्याने फुफ्फुसांचे रोग पसरत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

पुणे आणि मुंबईकडून धडा घेत आता ठाणे महापालिकेने आपल्या हद्दीत जागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याचे फलकही सर्वत्र लावण्यात आले आहेत. कबुतरांपासून सावधान असा इशारा देण्यात आला आहे. कबुतरांच्या पिसांसह विष्टेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनियाचा आजार बळावण्याचे प्रमाण पुण्यासह मुंबईत वाढत आहे. विशेषतः फुफ्फुसाशी संबंधित आजार असलेल्यांना हा आजार होण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के अधिक आहे. त्यामुळे कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नका. असे करताना आढळल्यास संबंधितांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा ठाणे महापालिकेने दिला आहे.

एचपी न्यूमोनियाची नाही स्वतंत्र नोंद

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीतील संसर्गजन्य आजारांचा अहवाल उपलब्ध करून दिला. त्यात हायपर सेन्सेटिव्ह (एचपी) न्यूमोनिया अशी स्वतंत्र नोंद नाही. न्यूमोनियामुळे बाधित झालेल्या १५०८ रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्यात जानेवारी २०२२ मध्ये २१७, फेब्रुवारी १५६ आणि मार्च महिन्यात सर्वाधिक २४४ रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या प्रभारी मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी सारिका फुंडे-भोसले म्हणाल्या, शहरातील विविध पुलांचे कोपरे, नदीपात्र, चौकातील सर्कल इथे मोठ्या प्रमाणावर खाद्यान्न टाकले जाते. त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांनाही होतो. म्हणून दोन-तीन वर्षांपूर्वी आम्ही पारव्यांना धान्य न टाकण्याबाबत फलक लावले होते. मात्र अनेकजणांनी त्याला विरोध केला. ठाणे महापालिकेने त्याच पद्धतीने जागृती मोहीम हाती घेतली आहे. कबुतरांमुळे पसरणारे हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनियासारखे आजार वाढत असल्यास आपणही पुन्हा जगजागृती मोहीम हाती घेऊ.  

न्यूमोनिया तज्ज्ञ वृषाली खिरीड-खडके 'सीविक मिरर'शी बोलताना म्हणाल्या, सामान्य न्यूमोनिया परजीवींमुळे होतो. त्यामुळेही फुफ्फुसांना बाधा होते. मात्र त्यात पू आल्यासारखा द्रव पदार्थ फुफ्फुसात साठतो. मात्र, हायपर  सेन्सेटिव्ह न्यूमोनायटिस हा बुरशीच्या माध्यमातून पसरतो. खाणी, घरातील ओल यामध्येही अशी बुरशी असू शकते. साखर कारखान्यातील मळीमध्येही अशा प्रकारची बुरशी असते. शहरात सामान्यपणे कबुतरांच्या विष्ठेतून आणि पिसातून अशी बुरशी परसते. त्याचे सूक्ष्म कण श्वासाद्वारे फुफ्फुसात गेल्यावर त्याचा विपरीत प्रभाव फुफ्फुसांवर होतो. त्यात श्वसनलिका आणि फुफ्फुसांचा दाह निर्माण होतो. काहींना ताप आणि दम लागतो, तर काहींना केवळ दमा असल्यासारखा दम लागतो. आजार बळावल्यास फुफ्फुसात व्रण पडतात. तोंड आल्यावर अथवा जखम झाल्यावर जशी लाली त्वचेवर येते तशा पद्धतीचे व्रण फुफ्फुसावर पडतात. कधीकधी फुफ्फुस निकामीही होऊ शकते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story