ठाकरे गटाच्या नेत्याच्या लग्नात गोगावलेंचा डान्स
#पनवेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे एक वजनदार नेते म्हणजे भरत गोगावले. कोणत्या ना कोणत्या कारणाने ते चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हीडीओ मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ते चक्क डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा अफलातून डान्स पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाकरे आणि शिंदे गटाचे राजकारणात हाडवैर असले तरी एका संघटनेत प्रदीर्घ काळ काम केलेल्या नेत्यांचे परस्परांशी चांगले संबंध असतात. जाहीररित्या ते एकमेकांच्या विरोधात असले तरी त्यांची मैत्री किंवा संबंध चांगलेच असतात, हे अनेक वेळा दिसून आले आहे. ठाकरे गटातील एका नेत्याच्या लग्नात गोगावले हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी स्टेजवर डान्सही केला. शिवसेना कोणाची यावरून दोन्ही गट निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आमने सामने आहेत. त्याचवेळी गोगावले यांनी ठाकरे गटाच्या नेत्याच्या लग्नात सहभागी होणे आणि डान्स करणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पनवेल तालुक्याचे ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या मुलीच्या लग्नाचा हा कार्यक्रम होता. शिंदे गटाचे आमदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. लग्नातील हळदीच्या कार्यक्रमास गोगावले आले आणि वधूला त्यांनी शुभेच्छा दिल्या. याच वेळी हळदी कार्यक्रमात सुरू असलेल्या डान्सवर ठेकाही धरला. हा त्यांचा व्हीडीओ सध्या व्हायरल झाला आहे. गोगावले यावेळी बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. शिंदे यांच्या बंडात प्रामुख्याने सहभागी झालेले भरत गोगावले महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.