ससून परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगवर गुन्हा
# पुणे
ससून रुग्णालयाच्या आवारात कोयते, चाकू उगारून दहशत माजवणाऱ्या कोयता गँगमधील सराईत गुन्हेगारांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस शिपाई राजू घुलगुडे (वय २९) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजू घुलगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजसिंग युवराजसिंग जुन्नी, कुलदीपसिंग लाखनसिंग जुन्नी, लाखनसिंग जर्मनसिंग जुन्नी, युवराजसिंग जर्मनसिंग जुन्नी, जलसिंग जर्मनसिंग जुन्नी, तोपनसिंग जर्मनसिंग जुन्नी, जसपालसिंग जपानसिंग जुन्नी, सावनसिंग काळुलिंग जुन्नी, जितेंद्र सिंग टाक, दीपमाला सागरसिंग जुन्नी, लक्ष्मीकौर अर्जुनसिंग भोंड, सपना कौर टाक, अज्जोकौर टाक, पानकौर टाक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर भागातील रामटेकडी परिसरात सराईत गुन्हेगारांच्या दोन गटांत शुक्रवारी दुपारी वाद झाला. जखमींना घेऊन हडपसर पोलिसांचे पथक ससून रुग्णालयाच्या आवारात दुपारी आले होते. त्यावेळी दोन्ही गट समोरासमोर आले. त्यांनी कोयते आणि चाकू उगारून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. ससून रुग्णालयाच्या आवारातील सुरक्षारक्षक आणि हडपसर पोलिसांच्या पथकाने सराईतांना रोखण्याचा प्रयत्न केला. हाणामारीत तीन ते चारजण जखमी झाले. पोलीस आणि ससून रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी आरोपींना रोखल्याने अनर्थ टळला. दरम्यान, सावनसिंग काळूसिंग जुन्नी (वय ३०, रा. बुद्ध विहाराजवळ, दापोडी) याने स्वतंत्र फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राजसिंग युवराज जुन्नी, कुलदीपसिंग लाखनसिंग जुन्नी, लाखनसिंग जर्मनसिंग जुन्नी, युवराजसिंग जर्मनसिंग जुन्नी, जलसिंग जर्मनसिंग जुन्नी, तोपनसिंग जर्मनसिंग जुन्नी, जसपालसिंग जपानसिंग जुन्नी (रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मधाले आणि उपनिरीक्षक गावडे करत आहेत.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.