दहशतवाद्यांकडे ४ किलो केमिकल पावडर
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
रात्रगस्तीमध्ये कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांकडून चार किलो केमिकल पावडर जप्त करण्यात आली आहे. ही पावडर विध्वंसक कारवायांसाठी वापरली जाते, अशी धक्कादायक माहिती एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने मिररशी बोलताना दिली. दिल्ली येथून ही पावडर आणल्याचे आणि हे दोघे परराज्यातील काही लोकांच्या संपर्कात असल्याने आता दोघांचा ताबा पुणे एटीएसकडे सोपविण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांनी तपासात चार किलो केमिकल पावडर, ड्रोन आणि अन्य काही साहित्य दोघांकडून जप्त केले आहे.
इम्रान खान आणि मोहम्मद युनुस अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये मार्च २०२२ मध्ये सापडलेल्या स्फोटकाच्या प्रकरणातले ते फरार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च २०२२ मध्येही ज्या कारमध्ये संशयिताला पकडण्यात आले होते, त्याच्याकडूनही अशाच प्रकारची पावडर जप्त करण्यात आली होती. या संशयिताशी इम्रान आणि मोहम्मद संपर्कात असल्याने ते फरार झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
राजस्थानातून फरार झाल्यानंतर हे दोघे मुंबईत आले होते. तेथून गेल्या पंधरा ते अठरा महिन्यांपूर्वी इम्रान आणि मोहम्मद हे पुण्यात आले होते. एका प्रींटिंगचा व्यवसाय करणाऱ्याकडे हे दोघे ग्राफिक डिझायनर म्हणून काम करीत होते. परंतु, त्यांचा पुण्यात येण्याचा उद्देश हा भिन्न असून, नव्याने देशविघातक गोष्टी करण्याचा या दोघांचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासून आहे.
कोथरूड भागात रात्रगस्तीवर असताना पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन या दोघांना इम्रान आणि मोहम्मद हे दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात आले. या दोघांना रंगेहाथ पकडल्यावर त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी करीत असताना इम्रान आणि मोहम्मदबाबत संशय वाटल्याने अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी केल्यावर धक्कादायक बाबींचा उलगडा झाला होता.
दोघांना दुचाकी चोरीच्या प्रयत्नात अटक केल्यावर संशय वाढल्याने कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, फौजदार प्रवीण कुलकर्णी यांना घटनास्थळी बोलावून पुढील तपास सुरू करण्यात आला होता.
ते राहात असलेल्या कोंढवा भागातील फ्लॅटवर फौजदार कुलकर्णी आणि कर्मचारी बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांना पाठविण्यात आले. तेव्हा या फ्लॅटमध्ये एक जिवंत काडतूस, चार मोबाईल, एक लॅपटॉप, इस्लामिक साहित्य आढळून आले. शिवाजीनगर न्यायालयात दोघांना हजर करण्यात आल्यानंतर इम्रान आणि मोहम्मद या दोघांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दोघांकडे कोथरूड पोलिसांनी केलेल्या तपासात यांच्याकडून चार किलो केमिकल पावडर, ड्रोन आणि अन्य काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पुण्यात यापूर्वी जर्मन बेकरी बॉम्बस्फोट आणि काही वर्षांनी जंगली महाराज रस्त्यावर साखळी बॉम्बस्फोट घडले होते. चोरीच्या वाहनांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे यापूर्वी देशभरातील यापूर्वीच्या घटनांवरून उघड झाले आहे.
त्यामुळे इम्रान आणि मोहम्मद या दोघांकडून कोथरूड भागात दुचाकी चोरीचा जो प्रयत्न झाला तो विघातक गोष्टींसाठी केला जाणार होता असाही संशय पोलिसांना आहे. इम्रान आणि मोहम्मद उत्तरेकडील राज्यातील काही लोकांच्या संपर्कात होते. या दोघांवर यापूर्वी राजस्थानमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या दोघांचे साथीदार देशभर पसरल्याचे कोथरूड पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. त्यामुळे आता आंतरराज्य संबंध उघड करण्यासाठी या दोघांचा ताबा शनिवारी (२२ जुलै) राज्य दहशतवाद विरोधी पुणे पथकाकडे देण्यात आला आहे. एनआयएकडून जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी पाच लाख रुपयांची रक्कम या दोघांना पकडणाऱ्या पोलिसांना देण्याबाबत अद्यापपर्यंत कोणताच निर्णय झालेला नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.