भाडेकरू पोलीस; पालिकाच ओलीस...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेच्या काही इमारती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. या इमारतींच्या भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडून महापालिकेला साडेपाच कोटी रुपये भाडे येणे आहे. वर्षानुवर्षे भाडे भरले नसल्याने मोठी थकबाकी राहिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 1 Apr 2023
  • 07:26 am
भाडेकरू पोलीस; पालिकाच ओलीस...

भाडेकरू पोलीस; पालिकाच ओलीस...

पिंपरी-चिंचवड पोलीसांनी महापालिकेचे थकवले ५ कोटी ६२ लाख रुपये, पाच वर्षांत दमडीही नाही

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेच्या काही इमारती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. या इमारतींच्या भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडून महापालिकेला साडेपाच कोटी रुपये भाडे येणे आहे. वर्षानुवर्षे भाडे भरले नसल्याने मोठी थकबाकी राहिली आहे.

पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे मिळून नव्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१८ पासून नवीन आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी देण्यात आली. १ जानेवारी २०१९ पासून प्रेमलोक पार्क येथील नवीन इमारतीतून पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले.

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी विविध कामकाजासाठी महापालिकेच्या इमारती भाडेतत्त्वावर देण्याबाबतची मागणी केली. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनच्या कार्यालयासाठी चिंचवड स्टेशन येथील प्रीमिअर प्लाझा येथील दोन मजली इमारत दिली आहे. तसेच सांगवीतील भाजी मंडईसाठी विकसित केलेले गाळे सांगवी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी देण्यात आले.

यासह पिंपरीतील मेघाजी लोखंडे कामगार भवन, मोहननगर येथील बहुउद्देशीय इमारत, पिंपळे गुरव उद्यानातील क्वार्टर्स, दिघी, वडमुखवाडी येथील जागाही पोलिसांच्या वाहतूक विभाग, गुन्हे युनिट शाखा या विविध विभागांसाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. मुख्यालयासाठी निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेची इमारत, तसेच मोकळी जागाही दिली आहे. थेरगाव पोलीस चौकीसाठी महिला विकास केंद्राची इमारत, गुन्हे शाखा युनिट दोनसाठी यमुनानगर येथील अहल्यादेवी होळकर व्यायामशाळा अशा विविध इमारती दिल्या आहेत.

दि. १५ ऑगस्ट २०१८ पासून अद्यापपर्यंत या इमारतींच्या भाड्यापोटी महापालिकेला ५  कोटी ६२ लाख रुपये थकबाकी येणे आहे. या थकबाकीची पूर्तता होण्याची महापालिकेला प्रतीक्षा आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त, प्रशांत जोशी म्हणाले,  "या थकबाकीसंदर्भात पोलीस विभागाशी संपर्क साधला आहे. अतिक्रमण कारवाईसाठी महापालिकेकडून पोलिसांचा बंदोबस्त घेतला जातो. त्यापोटी पोलिसांना पैसे दिले जातात. त्यातून थकबाकीची रक्कम वर्ग करून घेऊ का, अशी विचारणा पोलिसांना केली आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होऊन थकबाकीची पूर्तता होईल." 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story