तळीरामांना मैफलीसाठी अाडोसा प्यारा...
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
अर्धवट असलेल्या इमारती, महापालिकेच्या मंडई, मुळा-मुठेचा काठ, रस्त्याचा आडोसा आणि वाईन शॉप्स शेजारील दुकाने अशा कोणत्याही ठिकाणे तळीराम मैफल जमवताना दिसत आहेत. कात्रज, धनकवडीपासून कोथरूड आणि मुळा-मुठाकाठी सर्वत्र असे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकाराला आळा कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील चायनीज विक्रेते, अंडा बुर्जीची ठिकाणे पूर्वी तळारामांचे अड्डे होते. विशेषतः अनेक वाईन्स शॉप्सजवळच असे गाडे लागलेले असतात. तिथे बसून मद्यपान करायचे आणि गाड्यांवरील पदार्थ सेवन करायचे असा रिवाज तळीरामांचा होता. आता आडोसा असो की खुली जागा असो यावरही ते बिनधास्त ठाण मांडताना दिसत आहेत. सीविक मिररच्या प्रतिनिधीने काही ठिकाणांना भेट दिली. काही ठिकाणांची छायाचित्रे सीविक मिररच्या वाचकांनीही पाठवली. त्यावरून शहरात विविध ठिकाणी खुल्या आणि सध्या ओसाड असलेल्या सार्वजनिक जागीही तळीराम आपला अड्डा जमवत असल्याचे दिसून येत आहे.
कोथरूडमधील सुतार दवाखान्याच्या शेजारी गोपीनाथ मुंडे बहुद्देशीय हॉल आणि श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड माजी मार्केट आहे. या मार्केटचे काम गेल्या चार वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या इमारतीचा तीन मजल्यांचा सांगाडा बांधून तयार आहे. मात्र, अनेक कामे प्रलंबित आहेत. परिमाणी या मोकळ्या इमारतीत तळीराम सायंकाळी मैफल जमवत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच, संबंधित इमारतीच्या जिन्याजवळ चार ते पाच पोत्यांमध्ये मद्याच्या बाटल्या आणि पाण्याच्या मोकळ्या बाटल्या भरून ठेवलेल्या दिसून आल्या. तसेच, प्रत्येक मजल्यावर मद्याच्या रिकाम्या बाटल्या दिसून येत असून, सिगारेट्सची थोटके सर्वत्र विखुरलेली दिसत आहेत.
शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर पुलाच्या खालच्या बाजूस नदीच्या शेजारी दोन मद्यप्रेमी सायंकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास मद्य प्राशन करीत होते. नदीचा रम्य किनारा असल्यासारखी त्यांनी मैफल भरवली होती. नदीकिनारी भर उजेडी त्यांचा बिनधास्तपणे चाललेला हा प्रकार सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव येथील रहिवासी आणि सीविक मिररचे वाचक आशिष भोसले यांनी टिपला आहे. मुळा-मुठा नदीकाठ विकसित आणि सुशोभित होणार अशी नुसती आश्वासने दिली जात आहेत. मात्र नदीकाठ पाहून काही व्यक्ती बिनधास्त मद्य प्राशन करीत आहेत. मद्यपींना मुळा-मुठेचा किनारा गोव्याचा समुद्र वाटतो का, असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने अशांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
कात्रजमधील एका वाईन्स शॉप्सच्या शेजारी मद्यपींनी अस्वच्छता केली आहे. संबंधित वाईन्स चालकाने येथे मद्य पिण्यास मनाई असलेला फलक लावला आहे. त्या फलकाखालीच मद्यपी अड्डा जमवतात. याचबरोबर शेजारील विविध खाद्यपदार्थांचे गाडे आहेत. या भागातही मद्यपी मैफल जमवतात. येथील स्वराज्य संघटनेने संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
स्थानिक नागरिक राजू कदम म्हणाले, अनेक मद्यपी वाईन शॉप्सच्या आजूबाजूलाच मद्य प्राशन करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एका मद्यपीचा इथे खूनही झाला होता. आजूबाजूच्या नागरिकांना घाणीचा सामना करावा लागतोच. शिवाय मद्यपींमुळे होणारी भांडणे, शिवीगाळ याचाही त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली पाहिजे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.