वय उलटल्यावरही द्या स्पर्धा परीक्षा!

कोविडकाळात वाया गेलेल्या स्पर्धा परीक्षार्थींच्या दोन वर्षांच्या कालावधीची भरपाई करणारा स्तुत्य निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शासकीय कर्मचारी-अधिकारी बनू पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वय उलटून गेले असले तरी आता या निर्णयामुळे त्यांना स्पर्धा परीक्षा देऊन आपले स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 4 Mar 2023
  • 12:18 am
वय उलटल्यावरही द्या स्पर्धा परीक्षा!

वय उलटल्यावरही द्या स्पर्धा परीक्षा!

कोविडमुळे वाया गेलेल्या दोन वर्षांची भरपाई, शासकीय कर्मचारी-अधिकारी बनू पाहणाऱ्यांना दिलासा

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

कोविडकाळात वाया गेलेल्या स्पर्धा परीक्षार्थींच्या दोन वर्षांच्या कालावधीची भरपाई करणारा स्तुत्य निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शासकीय कर्मचारी-अधिकारी बनू पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वय उलटून गेले असले तरी आता या निर्णयामुळे त्यांना स्पर्धा परीक्षा देऊन आपले स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

कोविड काळात दोन वर्षे राज्यात स्पर्धा परीक्षा झाल्याच नाहीत. त्याचा फटका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो युवकांना बसला. त्यामुळे राज्य सरकारने वाया गेलेल्या या दोन वर्षांची भरपाई करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षार्थींच्या कमाल वयोमर्यादेत सरकारने दोन वर्षांची सवलत दिली आहे. त्यामुळे वनरक्षक, पोलीस भरतीसह राज्यातील ७५ हजार रिक्त जागांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी आणखी एक संधी परीक्षार्थींना मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेवरून वादंग निर्माण झाला आहे. नुकतेच राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या वर्णणात्मक परीक्षेचा सुधारीत अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, यासाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. शिक्षक, आरोग्य भरती, ग्रामसेवक, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणातील भरती प्रक्रिया रखडली आहे. राज्य सरकारनेही ७५ हजार पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे भरती प्रक्रिया झालेली नाही. तसेच, कोविडकाळात स्पर्धा परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. या कारणांमुळे वयाचे नुकसान झाल्याने संधी हातची गेल्याची भावना अनेक तरुणांमध्ये होती. भरती प्रक्रिया रखडल्याने राज्यातील अनेक तरूणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा उर्तीर्ण होऊनही गेली २ वर्षे मुलाखतीच झाल्या नाही. यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर हा तरुण नैराश्येच्या गर्तेत गेला. परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेने घेतलेल्या कर्जाचा वाढता डोंगर आणि घराच्या बिकट परिस्थितीला कंटाळून त्याने २९ जून २०२१ रोजी आत्महत्या केली होती. स्पर्धा परीक्षेबाबत राज्यातील तरुणांमध्ये आकर्षण आहे. अनेकदा नोकरी लागल्यावरही ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवतात. अनेकजण तर वयोमर्यादा संपेपर्यंत परीक्षा देताना दिसतात. आपल्याला मोठी सरकारी नोकरी लागेल, या आशेवरच ते नोकरी आणि कुटुंब सांभाळण्याची कसरत करीत परीक्षा देत असतात. अशांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

यांना मिळेल वयाचा फायदा...

शासन निर्णयाच्या दिनांकापासून (३ मार्च २०२३) ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सरळसेवा भरतीसाठी प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी दोन वर्षांनी वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. शासनाने २०१६ साली खुल्या प्रवर्गासाठी ३८ आणि मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ४० आणि ४५ अशी वयोमर्यादा राहील. त्याचबरोबर काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्ष आहे. त्यांनाही दोन वर्षे वयोमर्यादेतील सवलत मिळेल. त्याचबरोबर शासन निर्णय व्हायच्या आधी ज्या पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, त्यांची अर्ज भरण्याची मुदत संपलेली नाही, अशा पदभरतीसाठी हा निर्णय लागू असेल.        

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे महेश घरबुडे म्हणाले, ‘‘कोविडकाळात दोन वर्षे वाया गेली. या काळात परीक्षा न झाल्याने अनेकांना वयोमर्यादेचा फटका बसला. अशा विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्यायच झाला होता. त्यामुळे वयाचा नियम शिथिल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. ती सरकारने मान्य केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः वनरक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादाच २५ वर्षे आहे. अशा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अधिक फायदा होईल.’’

‘‘माझ्यासारखे अनेकजण काम करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. शासकीय अधिकारी बनण्याचे त्यांचे स्वप्न असते. काही जण अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. तर, काही जण पूर्णवेळ नोकरी करून कुटुंबाला हातभार लावत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. अनेकांना कौटुंबिक आणि आर्थिक समस्येमुळे कॉलेज संपल्यानंतर लगेचच नोकरी पत्करावी लागली. अशा व्यक्ती आपला संसार करत स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. स्पर्धा परीक्षा ही त्यांच्यासाठी एक प्रकारची नशा असते. त्यामुळेच माझ्यासारखे काहीजण वयाची तिशी ओलांडल्यानंतरही स्पर्धा परीक्षा देत आहेत. त्या व्यक्तींना या निर्णयामुळे खूपच दिलासा मिळाला आहे,’’ अशी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे राहुल काळे यांनी व्यक्त केली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story