दिवसा घरफोड्या करणारी 'स्वामी'टोळी अटकेत
#विश्रांतवाडी
पुणे शहरातील विविध भागांत दिवसाढवळ्या घरफोडी करणार्या टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका सराफाचादेखील समावेश असून, त्यांच्या ताब्यातून सात लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण घरफोडीचे आठ गुन्हे पोलिसांनी उघड केले असल्याची माहिती गुरुवारी दिली आहे.
पंचाक्षरी संगय्या स्वामी (वय ३५), शावरसिद्ध भरत पुजारी (वय ३५), नरेश विष्णू अच्चुगटला (वय ३३), अंगद वाल्मिक मंडगर (वय ३०), कल्याणप्पा मलप्पा इंडी (वय ४९,रा. सर्व सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. ही टोळी पुणे शहरात दिवसा बंद असलेली घरे शोधून घरफोड्या करत होती. नोकरी अथवा कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या नागरिकांच्या घराची रेकी करून चोरटे त्यांचा डाव साधत होते.
विश्रांतवाडी परिसरातील घरफोडीच्या गुह्यातील आरोपींचा शोध घेत असताना, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यामार्फत पोलिस कर्मचारी संपत भोसले व प्रफुल्ल मोरे यांना माहिती मिळाली की, मुंजाबावस्ती येथे तीन व्यक्ती संशयितरीत्या थांबले असून, ते घरफोडीच्या तयारी आहेत. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी दोन पथके तयार करून तिघां आरोपीना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला.
पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखून तिघांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तिघांनी विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यातून कटावणी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कामगिरी अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त श्रीकांत बोराटे, साहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते, हवालदार दीपक चव्हाण, यशंवत कर्वे, संदीप देवकाते, शेखर खराडे यांच्या पथकाने केली.