कच्चा माल पुरवण्याच्या बहाण्याने ८५ लाखांचा गंडा
#शिवाजीनगर
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील रिको इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला कच्चा लोखंडी माल पुरवण्याच्या बहाण्याने पश्चिम बंगालमधील एका उद्योजकाने तब्बल ८५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालमधील आश्रज स्टील कंपनीचा विवेक शॉ या आरोपीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शर्तिका राकेश खजुरिया (वय ३७, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यांनी आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार रिको इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे येथे काम करत आहेत. एम. एस. प्लेट हा कच्चा लोखंडी माल पुरवण्याकरता तक्रारदार यांच्या कंपनीशी एम. एस. स्टील उद्योगातर्फे विवेक शॉ यांनी इंडिया मार्ट या वेबसाईटद्वारे संपर्क साधला होता. त्यांच्या कंपनीकडून कमी दराच्या कोटेशनचे आमिष देऊन वेळोवेळी माल देण्याच्या बहाण्याने वेगवेगळी बिले तयार करून कंपनीची दिशाभूल करून एकूण ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. साळवे तपास करत आहे.
feedback@civicmirror.in